बुलढाणा : संतनगरी शेगाव येथे आज श्रीराम नवमी उत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त शेगाव नगरी सज्ज झाली असून मंदिर परिसर सजले आहे. राज्यभरातून ६७० च्यावर भजनी दिंड्या व राज्यातील हजारो भाविक दाखल झाले आहे. यामुळे गजानन महाराज मंदिर परिसर व रस्ते भाविकांनी फुलले आहे. श्रींच्या मंदिरात १३० व्या श्रीराम नवमी उत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
आध्यात्म रामायण स्वाहाकार यागास १३ एप्रिलला आरंभ झाला होता. आज सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान , १० ते १२ यादरम्यान श्रीराम बुवा ठाकूर यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन पार पडले.
हेही वाचा…माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात, सीटबेल्ट लावला असल्याने अनर्थ टळला
नगर परिक्रमा
आज संध्याकाळी ४ वाजता श्रींच्या पालखीच्या नगरपरिक्रमेला सुरुवात होईल. शपालखी रथ, मेणा ,अश्व, टाळकरी, पताकाधारी सह परिक्रमेला सुरुवात होणार आहे. सायंकाळी पालखी श्रींच्या मंदिरात नगर परिक्रमा करून पोहोचेल व आरती होईल. रात्री ८ ते १० श्रीहरी बुवा वैष्णव यांचे किर्तन होणार आहे
परिक्रमा मार्ग
गजानन महाराज मंदीर उत्तर द्वार (‘जनरेटर रुम’ जवळील) मधुन बाहेर, महात्मा फुले बँकेसमोरुन, क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले चौक, सावता महाराज चौक, हरिहर मंदीर, भीम नगर, तिन पुतळा परिसर, न प शाळा फुले नगर, प्रगटस्थळ, सितामाता मंदीर असा मार्ग आहे. लायब्ररी पुलावरुन मंदीराचे पश्चिम द्वार मधुन श्रींचे मंदीर परिसरामध्ये परत. श्रींचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी, श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचे पारायण मंडप, श्रींची गादी पलंग, दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा…पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
१८ एप्रिलला सांगता
श्रींच्या मंदिर परिसरात आंबाच्या पानांचे तोरण, केळीच्या खांबा, रंगबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. श्रींचे आराध्यदेवत असलेल्या प्रभु श्री राम व श्रींच्या मंदिरावर व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. १८ एप्रिल रोजी श्रीराम बुवा ठाकूर यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे किर्तन व दहिहंडी, गोपालकाला नंतर उत्सवाची सांगता होईल.