बुलढाणा : विदर्भ पंढरी शेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम नवमी उत्सवाला पारंपरिक उत्साहात आणिविविध धार्मिक कार्यक्रमानी प्रारंभ झाला. दरम्यान मराठी पंचांगा नुसार नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला माउलींच्या दर्शनासाठी राज्यातील भाविकांची शेगाव नगरीत मंदियाळी जमल्याचे दिसून आले.
संत गजानन महाराज संस्थांनाचा मोठा उत्सव असलेल्या राम नवमी उत्सवास विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. यामध्ये दररोज मंदिरामध्ये सकाळी ६ ते ६.४५ वाजे दरम्यान काकडा , ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.१५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० पर्यंत महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे श्रीहरी कीर्तन असे दैनंदिन धार्मिक राहणार आहे. ३० मार्च रविवार ते पासून ६ एप्रिल रविवार पर्यंत सप्ताहभर पार पडतील. रविवारी ३० मार्च रोजी श्रीहरी कीर्तन ह भ प भाऊराव बुवा सुशिर श्री क्षेत्र मुक्ताईनगर यांचे श्रीहरी कीर्तन रात्री ८ ते १० दरम्यान पार पडले . आज सोमवार ३१ मार्चला ह भ प ज्ञानेश्वर बुवा काकडे मु हावरगांव यांचे कीर्तन होईल, मंगळवार, १ एप्रिल रोजी ह भ प पोपट बुवा फरकाडे छत्रपती संभाजीनगर, बुधवार २ एप्रिल रोजी ह भ प बळीराम बुवा दौंड मु .शिवर , गुरुवार ३ एप्रिल रोजी ह भ प ज्ञानेश्वर बुवा बेलदारवाडीकर बेलदारवाडी , शुक्रवार ४ एप्रिल रोजी ह भ प सोपान बुवा सानप (शास्त्री) हिंगोली , शनिवार ५ एप्रिल रोजी ह भ प भगीरथ बुवा काळे नाशिक यांचे कीर्तन पार पडणार आहे ६ रविवार चैत्र शुद्ध ९ श्रीराम नवमीदिनी ह भ प श्रीराम बुवा ठाकूर लातूर यांचे सकाळी १० ते १२ यावेळेत ‘श्रीराम जन्मोत्सवाचे’ किर्तन होईल.
राम नवमीला नगर परिक्रमा
२ एप्रिल पासून अध्यात्म रामायण स्वाहाकार यज्ञास आरंभ होणार आहे. श्रीराम नवमी उत्सव निमित्त अध्यात्म रामायण स्वाहाकारास यज्ञास चैत्र शु ५ बुधवार २ एप्रिल ला आरंभ होईल. चैत्र शु ९ रविवार ६ एप्रिल श्रीराम नवमीदिनी सकाळी १० वाजता यज्ञाची पुर्णाहुती व अवभृतस्नान होईल. तद्नंतर श्रींच्या मंदिर परिसरातून दुपारी श्रीराम नवमी उत्सवा निमित्त श्रींची पालखी रथ ,अश्वासह , पताकाधारी टाळकरी व वारकरी टाळ मृदुंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात पालखी परिक्रमाकरिता निघेल.
श्रीराम उत्सवाची सांगता
श्रीराम उत्सवाची सांगता ७ एप्रिल सोमवार ला हभप प्रमोद बुवा राहाणे पळशी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे किर्तन व नंतर दहीहंडी गोपाल काला होऊन १३१ व्या श्रीराम नवमी उत्सवाची सांगता होईल.
भजनी दिंड्या
दरम्यान राम नवमी उत्सवा निमित्त संत नगरी शेगावात भजनी दिंड्यांचे आगमन सुरू झाले आहे. शहरात ज्ञानोबा तुकाराम, श्री राम जय राम, जय जय राम, असा नामघोष करीत राज्यातील भजनी दिंड्यांचे आगमन होत आहे.
श्री संस्थान मध्ये गुढीपाडव्यानिमित्त उभारली गुडी
गुढीपाडव्यानिमित्त श्री संस्थान मध्ये पारंपारिक पद्धतीने विधिवत पूजन करून गुढी उभारण्यात आली. श्रींच्या मंदिरात आंब्याच्या पानाची तोरणे केळीचे खांब लावून सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले असून गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाचे स्वागत श्रींच्या दर्शनाने करण्याच्या इच्छेने भाविकांचा मेळा पहाटेपासूनच विदर्भाची प्रति पंढरी व महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन भक्तिमय वातावरणात मंत्र जाप करत ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः, गण गण गणात बोते, अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय करीत भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन करून मराठी नूतन वर्षाचे व गुढीपाडव्याचे स्वागत केले. गुढीपाडवा व मराठी नववर्षाची सुरुवात श्रींच्या दर्शनाने भाविकांकडून करण्यात आली. भक्तांचे माहेर सर्व सुखाचे भंडार असलेल्या शेगावात श्रींच्या समाधी दर्शनाने मराठी नवीन वर्षाची सुरुवात श्रींच्या आशीर्वादाने केली. त्याचप्रमाणे असंख्य भाविकांनी श्री दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाच्या २१ अध्यायाचे वाचन करून पारायण केले.