भंडारा : ‘सबके है राम’ असे म्हटले जाते. मात्र भंडारा येथे आयोजित श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम सर्वसमावेशक नसून श्रीराम जन्मोत्सव समितीने राम जन्मोत्सवाला ‘हायजॅक’ केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. शिवाय पोलीसांच्या उपस्थितीतच मध्यरात्रीपर्यंत गीतांचा कार्यक्रम मोठ्या आवाजात सुरू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
श्री राम जन्मोत्सव समिती आणि श्री राम शोभायात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजवर या समितीत सर्वसामान्य रामभक्त असायचे मात्र यावर्षी समिती गठीत करताना आयोजक आणि प्रायोजकांच्या मर्जीतील आणि जवळच्या लोकांनाच संधी देण्यात आल्याने वर्षानुवर्षे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात उत्साहाने सहभागी होणाऱ्या राम भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. २५ ते २९ मार्च दरम्यान ५ दिवसीय तथाकथित भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कार्यक्रमाच्या आयोजनावरून अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. मुळात भंडाऱ्यात मराठी भाषिकच अधिक असताना मराठी गीत गायन, सूमधूर संगीत, भजन संध्या किंवा गीत रामायणासारख्या कार्यक्रमांना यात कुठेही स्थान का देण्यात आलेले नाही ? या कार्यक्रमाला भव्यदिव्य करण्यासाठी अनाठायीपणे लाखो रुपये खर्च करून ‘ फेम’ असलेल्या हिंदी गायक आणि गायिकांना कार्यक्रमासाठी ‘इम्पोर्ट ‘ करण्यात आले आहे. दररोज एखाद्या लाईव्ह कन्सर्ट प्रमाणे कार्यक्रम असतो. मात्र यातून भक्तीमय वातावरण निर्मिती कितपत होते हा प्रश्नच आहे. राम जन्मोत्सवात रामायण किंवा राम चरित्र कथनापेक्षा कृष्णलीला, महारास, पुष्पहोली, शिव विवाह, शिव भस्म आरती असे कार्यक्रम अंतर्भूत करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> प्रकल्पग्रस्तांना १५ टक्के आरक्षण द्या; शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
भव्य दिव्य करण्याच्या नादात निव्वळ ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ करून धांगड धिंगा होत असल्याने शांतता भंग होत असल्याची खंतही परिसरातील काही नागरिकांनी बोलून दाखविली आहे. कार्यक्रमासाठी देण्यात आलेल्या व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पासेस देण्यात आल्या आहेत. मात्र व्हीआयपी नेमके कोण ? कारण या पासेसवरही प्रायोजक आणि आयोजकांच्या जवळचेच गर्दी करीत आहेत. सर्वसामान्य रामभक्तांना मागेच बसावे लागते. या कार्यक्रमाला धार्मिक आणि सांस्कृतिक पेक्षा राजकीय रंग चढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच माधव नगरचे केंद्राचे रेल्वे मैदान आमदार आणि खासदारांचे सामर्थ्य दाखविण्याचा आखाडा बनल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे रात्री १० वाजता नंतर लाऊडस्पीकर आणि म्युझिक सिस्टीमच्या वापरावर बंदी असताना दोन दिवस मध्यरात्रीपर्यंत कार्यक्रम मोठ्या आवाजात सुरू होते. यावर कारवाई का करण्यात आली नाही ? याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना विचारणा केली असता पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस प्रशासनच दबावाखाली काम करत असल्याची प्रचिती येत आहे.
हेही वाचा >>> नागपूर: उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या प्रतिमेला चपला मारणार का…? बावनकुळे यांचा सवाल
या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत एक उत्तम आणि कौतुकास्पद कार्यक्रम झाला तो म्हणजे कोरोना वॉरियर्सचा सत्कार. मात्र विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून हिचं सामाजिक बांधिलकी जपत आवाजाच्या मर्यादेवरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यात जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन बघ्याची भूमिकेत आहे.
विकास कार्य करून चांगले नाव मिळविलेल्या आमदारांनी अशा कार्यक्रमांना प्रायोजित करून निधीचा अपव्यय करणे कितपत योग्य आहे याचाही विचार करायला हवा. राम जन्मोत्सव कार्यक्रम भव्यदिव्य करण्यापेक्षा तो सर्व समावेशक आणि भक्तीमय होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.