अकोला : नथुराम गोडसे नीच आणि नालायक ब्राह्मण होता. त्यांने महात्मा गांधींमधील महात्म्याला ठार मारले. आजचे हिंदुत्ववादी त्याच नथुराम गोडसेचे पुतळे व मंदिरे उभारत आहेत. हे धर्माचे नसून धर्माच्या घातकपणाचे कार्य आहे, असे वक्तव्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. यावेळी त्यांनी ब्राह्मण समाजावर टीका करून पूर्वजांच्या चुकीबद्दल माफी देखील मागितली.
अकोला जिल्ह्यातील अकोट येथे श्री शिवाजी महाविद्यालयात वाङमय विलास गौरवग्रंथ व विलास तायडे लिखित बैलबंडी ते हवाई दिंडी पुस्तक प्रकाशन व नागरी सत्कार समारंभ रविवारी आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नथुराम गोडसे व ब्राह्मण समाजावर तोंडसुख घेऊन हिंदुत्ववाद्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
म्हणे, ‘हे धर्माचे घातकपण…’
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘‘नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण. या माणसाने महात्मा गांधी यांच्यामधील महात्म्याला मारलं. त्याचे हे हिंदुत्व आजचे हिंदुत्ववादी डोक्यावर, कपाळावरती टीळा लावून फिरत आहेत. नथुराम गोडसेचे पुतळे, मंदिरे उभारत आहेत. हे धर्म कार्य नव्हे, तर हे धर्माचे घातकपण आहे. अशा धर्मापासून देशाचे संरक्षण करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे विवेकी धर्मनिष्ठ हा महत्त्वाचा विचार आहे. मी पुर्वजांच्या पापांबद्दल आज तुमच्या सर्वांसोबत माफी मागतो.’’
यापूर्वीही डॉ. सबनीसांच्या वादग्रस्त विधानावरून मोठे वाद पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याकडे होते. डॉ. सबनीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेक वेळा मोठे वाद निर्माण झाले आहेत. राजकारणावर भाष्य करून विविध राजकीय नेत्यांचा देखील त्यांनी आपल्या भाषणामधून विविध कार्यक्रमांमध्ये जोरदार समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने डॉ. सबनीस चांगलेच अडचणीत आले होते. तत्कालीन राज्यपालांवर टीका करतांना सुद्धा त्यांची जीभ घसरली होती. आता डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अकोट येथील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केलेल्या विधानामुळे सुद्धा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.