यवतमाळ : एसटीची भाडेवाढ झाल्यावर दहा टक्क्यांनी प्रवाशी संख्येत घट झाल्याचे या पूर्वी निदर्शनास आले आहे. पण काही दिवसांत पुन्हा परिस्थिती सुधारली. मात्र त्यानंतर दोन महिने उलटून गेले तरी परिस्थिती पूर्व पदावर न येणे व प्रवासी संख्येत मोठी घट होणे हा चिंतनाचा व चिंतेचा विषय आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले.

बरगे हे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी विभागीय कार्यालय-यवतमाळ, पुसद , दिग्रस व वणी आगारास भेट दिली व एसटी कामगारांचे प्रश्न समजून घेतले. त्या नंतर एसटीच्या यवतमाळ येथील विभागीय कार्यालयासमोर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, मार्च महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या १८ दिवसात प्रवाशी संख्येत प्रतिदिन सरासरी तीन लाखांनी घट होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जुन्या मोडकळीस आलेल्या गाड्या, पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध नसणे, भाडेवाढ झाल्यानंतर आगार व विभाग अथवा मध्यवर्ती कार्यालय पातळीवर या संदर्भात आढावा घेऊन ज्या मार्गावर प्रवासी संख्या कमी आहे. त्या ठिकाणी प्रवासी संख्या वाढ होण्यास उपाययोजना करण्याचा अभाव अशी कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुट्या पैशावरून वाहक व प्रवाशी यांच्यात दररोज वादावादी होत असल्याने सुटे पैसे नसतील तर प्रवासी गाडीत बसायला तयार नाहीत, हे सुद्धा एक मुख्य कारण असू शकते. या सर्व विषयात आता वरिष्ठ पातळीवर चिंतन करण्याची गरज असून या शिवाय सरकारने वेळीच आर्थिक मदत केली नाही तर या पुढे स्पेअर पार्टस व इंधनासाठी गाड्या थांबतील व कर्मचाऱ्यांना भविष्यात निवृत्ती नंतरची देणी मिळणार नाहीत, अशी विदारक स्थिती असल्याचेही बरगे यांनी स्पष्ट केले.

एसटी कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी थकीत

यवतमाळ जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांची देणीसुद्धा मोठ्या प्रमाणात थकली आहेत. दिवाळी सण उचल मागणी करणाऱ्या एक हजार ८२० कर्मचाऱ्यांना दोन कोटी २७ लाख इतकी रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे बरगे म्हणाले. सध्या सुरू असलेल्या रमजान ईद सणासाठी उचल मागणी करणाऱ्या १५८ कर्मचाऱ्यांना अंदाजे २० लाख रुपये इतकी रक्कम मिळालेली नाही. या शिवाय नाताळ सणासाठी सण उचल मागणी करणाऱ्या ६९ कर्मचाऱ्यांना आठ लाख ६२ हजार रुपये इतकी रक्कम मिळाली नाही. नोव्हेंबरपासून पीएफ अँडव्हान्स रक्कम मागणाऱ्या २२७ कर्मचाऱ्यांना दोन कोटी ७८ लाख रुपये इतकी रक्कम मिळाली नाही. वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती रक्कम एक कोटी ३४ लाख रुपये इतकी रक्कम गेले वर्षभर प्रलंबित आहे. एकूण थकीत देणी रक्कम देण्यात आलेली नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत, असे बरगे म्हणाले.

अत्यावशक सेवा म्हणून प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुट्टी न घेता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व कुटुंबियांना सण साजरे करण्यासाठी उचल रक्कम न मिळणे ही चिंतेची बाब आहे. याचा त्यांच्या कामावर व गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे दिसून येते. यामुळे औद्योगिक अशांतता निर्माण होत असल्याने वारंवार आंदोलने सुरू असल्याचे बरगे म्हणाले. या दौरा कार्यक्रमात संघटनेचे सह सरचिटणीस चंदन राठोड, विभागीय अध्यक्ष भगवान हरसुले, विभागीय सचिव सुशांत इंगळे, गणेश शेंडगे, अमजद खान, सय्यद जहीर, समाधान चोंडकर, राहुल डाखोरे, नवलकुमार गवई, विनोद चव्हाण, सतीश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.