अमरावती : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. श्याम मानव हे सातत्‍याने भाजपवर टीका करताना दिसतात. ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ या त्‍यांच्‍या व्‍याख्‍यानमालेचे आयोजन सध्‍या ठिकठिकाणी केले जात आहे. ही व्‍याख्‍यानमाला सध्‍या गाजत आहे. पण चांदूर बाजार येथील त्‍यांच्‍या व्‍याख्‍यानाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्‍यात आल्‍याने वेगळीच माहिती समोर आली आहे.

चांदूर बाजार येथील प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानात त्यांनी भाजप विरोधात बोलू नये तसेच आमदार बच्चू कडू यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडाव्यात, अशी अट काँग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष  बबलू देशमुख यांनी घातली होती. प्रा. श्याम मानव यांनी या अटी मान्य न केल्यामुळे बबलू देशमुख यांनी व्‍याख्‍यान रद्द केल्‍याचा आरोप होत आहे.काँग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख हे भाजपचे ‘स्‍लीपर सेल’ म्‍हणून काम करीत आहेत, अशी टीका प्रा. श्‍याम मानव यांनी केली आहे. प्रसार माध्‍यमांशी बोलताना त्‍यांनी हे विधान केल्‍याने जिल्‍ह्यातील राजकीय वर्तूळात त्‍याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा >>>पोलिसांना झाले तरी काय ? अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या दोन पोलिसांना अटक

अमरावतीत प्रा.श्याम मानव यांची व्याख्यानमाला पार पडली. दोन दिवसांआधी चांदूर बाजार येथे देखील महाविकास आघाडीच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी या व्याख्यानमालेत प्रा.श्याम मानव यांनी भाजप विरोधात बोलू नये, तसेच विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्यावर आरोप करावेत, अशी आग्रही अट प्रा. श्‍याम मानव यांच्‍या कार्यकर्त्‍याशी बोलताना घातली होती, अशी माहिती श्‍याम मानव यांनी दिली.

हेही वाचा >>>Teosa Vidhan Sabha Constituency : यशोमती ठाकूर यांच्यासमोर आव्हान कोणाचे ?

प्रा. श्‍याम मानव म्‍हणाले, मी कुणाची सुपारी घेत नाही आणि कुणाच्याही अटीवर काम करत नाही. आपल्याला भाजपच्या मतांची मदत व्हावी, यासाठी काँग्रेसचे काही पुढारी हे पक्षाची विचारधारा सोडून भाजपच्या विचारधारेचे प्रोत्साहन करतात किंवा भाजपला अप्रत्यक्षपणे मदत होईल असे वागतात. असे अनेक ‘स्‍लीपर सेल’ काँग्रेसमध्ये आहेत त्यामुळेच काँग्रेसची ही अवस्था झाल्याची टीका देखील प्रा.श्याम मानव यांनी केली आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्याप्रमाणे काँग्रेसचे शुद्धीकरण करत आहेत, त्‍यामुळे काँग्रेस मध्ये असलेले असे भाजपचे छुपे समर्थक हाकलले पाहिजेत, असेही प्रा. मानव म्हणाले.यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता बबलू देशमुख यांच्‍याशी संपर्क होऊ शकला नाही.