लोकसत्ता टीम
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे अभयारण्य वाघासह इतर प्राण्यांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. येथे पूर्वी वाघ दर्शन होईल या आशेने पर्यटक यायचे पण त्यांना हे दर्शन कधी काळीच व्हायचे. पण चंद्रपूर जिल्ह्यातून येथे दोन वाघ सोडल्यानंतर परिस्थिती बदलली आहे.
सध्या या नवेगाव नागझिरा अभयारण्यात येथील विविध गेटवरून येणाऱ्या पर्यटकांना वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. तर अशातच पिटेझरी गेट वरून पर्यटकांनी काल २ फेब्रुवारी शुक्रवारी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात टी १ वाघीण व तिचे दोन बछडे आपसामध्ये मस्ती करत असतानाचे दर्शन झाले. पर्यटकाने आपल्या मोबाईल मध्ये त्यांचे चित्रफीती काढली असून ती चित्रफीती सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. त्यामुळे आता नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आणखी वाचा-चंद्रपुरात परराज्यातून शस्त्र तस्करी
नवेगाव नागझिरा अभयारण्यात भ्रमंती करत असताना इतर अभयारण्याप्रमाणे पर्यटकांना येथे मोबाईल बंदी नाही त्यामुळे येथे पर्यटक या अभयारण्यातील विविध देखावे आपल्या मोबाईलमध्ये टिपतात. अश्याच प्रकारे एक हौसी पर्यटक पवन सोनावणे यांना शुक्रवारी २ फेब्रुवारी ला आपल्या कुटुंबीय सोबत जिप्सी गाडी ने भ्रमंती करत असताना टी १ वाघीण आणि तिचे दोन छावे मस्ती करत असताना दिसून आले असता त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्यांचे चित्रण टिपले आहे.