अकोला : पृथ्वी स्वत:भोवती फिरत असल्याने सूर्य, तारे, चंद्र व ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना दिसतात. एखाद्यावेळी चांदणीदेखील सरकताना दिसते, मात्र ती चांदणी नव्हे तर मानव निर्मित कृत्रिम उपग्रह असतो.
अंतराळ अभ्यास व संशोधनासाठी जगातील १६ देशांनी एकत्र येऊन एक महाकाय आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक उभारले. ११ ते १६ मे दरम्यान सहा दिवसांच्या कालावधीत पहाटे व रात्री अवकाश स्थानकाचे दर्शन होणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.
हेही वाचा – नागपूर : विदेशातून ‘गिफ्ट’चे आमिष; गृहिणीची फसवणूक
अवकाश स्थानक दरताशी सुमारे २८ हजार किलोमीटर या वेगाने साधारण ४०० किलोमिटर अंतरावरून पृथ्वीभोवती फिरणार आहे. ते आपल्या भागात आले तेव्हा ते नुसत्या डोळ्यांनी पाहून आनंद घेता येईल. स्थानपरत्वे त्याच्या तेजस्वीपणात, वेळात व दिशेत बदल होत असतो.
११ मे ते १६ हे दरम्यान सहा वेळा पहाटे व सहा वेळा रात्री असे बारा वेळा दर्शन होणार आहे. ११ मे रोजी रात्री ७.१३ ते ७.१६ या वेळी दक्षिण आकाशात पूर्वेकडे जाताना दिसेल, ही प्रकाशणारी फिरती चांदणी पाहिल्यानंतर पुन्हा रात्री ८.४८ ते ८.५१ यावेळेत पश्चिमेकडून उत्तर बाजूस हा आकाश नजारा बघता येईल. १२ मेच्या पहाटे ५.०२ ते ५.०७ पर्यंत उत्तरेकडील आकाशात पूर्वेकडे फिरत जाताना दिसेल.
याच दिवशी रात्री ७.५९ ते ८.०६ यावेळी अधिक प्रमाणात प्रकाशवाना नैऋत्य ईशान्य आकाशात बघता येईल. १३ मे रोजी पहाटे ४.९३ ते ४.१८ यावेळेत उत्तर पूर्व बाजूला आणि संख्याकाळी ७.११ ते ७.१७ च्या दरम्यान नैऋत्य ईशान्य आकाशात अधिक चांगल्या प्रतीची चांदणी बघायला मिळेल. १४ मे रोजी पहाटे ५.०१ ते ५.०८ दरम्यान वायव्य ते आग्नेय आकाशात अपूर्व अनुभूती घेता येईल. पुन्हा रात्री ८ ते ८.०४ या वेळेत पश्चिमेकडून उत्तर बाजूस पाहता येईल. १५ मे रोजी पहाटे ४.१३ ते ४.१९ दरम्यान उत्तरेकडून पूर्वेकडे आणि रात्री ७.११ते ७.१६ या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस बघता येईल. १६ मे रोजी पहाटे ३.२९ ते ३.३० या वेळी पूर्व आकाशात अगदी कमी वेळ तर पुन्हा पहाटे ५.०२ ते ५.०६ दरम्यान पश्चिम आकाशात दक्षिणेकडे जाताना बघता येईल. सहा दिवसांचा अनोखा आकाश नजारा आकाश प्रेमींनी अनुभवावा, असे आवाहन दोड यांनी केले आहे.