अकोला : रात्रीच्या आकाशात नेहमी ग्रह तारकांचा नजारा अनुभवता येतो. भरदिवसा आकाश मध्याशी चंद्रकोरी जवळ जरा वरच्या बाजूला सुमारे ४ अंश अंतरावर शुक्राच्या चांदणीचे दर्शन शुक्रवारी दुपारी अकोला शहरात घडले. या प्रकारे शनिवारी दुपारी २ वाजतानंतर देखील भरदिवसा शुक्राच्या चांदणीचा अनुभव घेता येईल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली. ही अतिदुर्मीळ घटना अवकाश प्रेमींसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे.
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतरे सापेक्ष दृष्टीने कमी अधिक होतात. मनोहारी व आकर्षक आकाश नजाऱ्याचा आनंद घेता येतो. शुक्रवारी दुपारी आकाश मध्याशी चंद्रकोरीजवळ शुक्राच्या चांदणीचे दर्शन झाले. हा दुर्लभ आनंद शनिवारीदेखील घेता येणार आहे. प्रारंभी आकाश मध्यावर व नंतर पश्चिम आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. उंच इमारती किंवा उंच व दाट झाडांच्या सावलीतून हा अनोखा आकाश नजारा पाहणे सोईचे ठरणार आहे. आधी चंद्र बघून नंतर जरा पुढील भागात शुक्र भरदुपारी २ वाजताच्या सुमारास पाहता येईल, असे प्रभाकर दोड म्हणाले.
हेही वाचा – वाघनखे विक्रीचा प्रयत्न फसला, ताडोबात चार वर्षांपूर्वी…
शहरातील बाल शिवाजी, महाराष्ट्र माध्यमिक, स्कूल ऑफ स्काॅलर्स, शासकीय अध्यापक महाविद्यालय, मनुताई कन्या, सन्मित्र पब्लिक स्कूल आदी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षकांनी अनोख्या आणि अतिदुर्मीळ संधीचा लाभ घेऊन आनंद व्यक्त केला. यावेळी प्रभाकर दोड यांनी आवश्यक ती माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्राचेही दर्शन
७ जानेवारीला उत्तर आकाशात उदय होणारे सात ताऱ्यांचे सप्तर्षी अधिक रंगत आणतील. सोबतच आकाशात फिरणाऱ्या स्टार लिंक्स आणि याच वेळी दक्षिण आकाशात ७.२७ ते ७.२९ या कालावधीत आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्रसुद्धा बघता येणार आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांना विहिरी मोफत ! ‘या’ नामांकित उद्योगाचा पुढाकार
एकाच वेळी दिसतील सात राशी
सूर्य, चंद्र व ग्रह आकाशात ज्या मार्गाने सूर्याभोवती फिरतात त्याला आयनिकवृत्त किंवा राशीचक्र म्हणतात. या १२ राशीतील पूर्व क्षितिजावर नुकतीच उदय पावणारी कर्क राशी, तिच्यावरची मिथुन, नंतरची वृषभ व पुढे मेष अश्विनीसह बघता येणार आहे. यावेळी अष्टमीचा अर्धा चंद्र मीन राशीत व नंतर पश्चिमेस कुंभ राशी व मकर राशी मावळतीला असेल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.