अकोला : आषाढी एकादशीला डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी. वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व तसेच पंढरपूरची वारी याविषयीची माहिती सनातन संस्थेच्या विभा चौधरी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१.आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.
२.‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरत्व मिळवले. ब्रह्मदेव, विष्णु, शिव यांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे, अशी आख्यायिका आहे.
३.आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे.

हेही वाचा…नागपूरमध्ये वंचितचे कार्यकर्ते भाजपात

४.व्रत करण्याची पद्धत – आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा, रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.
५.एकादशीचा अर्थ म्हणजे एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे, लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे रहावे. मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे.
६.एकादशीच्या दिवशीचे तत्त्व साधना करण्याला अनुकूल असते. एकादशी प्रतिदिनच केली पाहिजे; मात्र एक दिवस योग्य तर्‍हेने केल्यास त्याचा प्रभाव १५ दिवस टिकतो; म्हणून एका मासात २ एकादशी असतात.
७.अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो.

हेही वाचा…मोदींवर टीका करताच भाजप आमदार भडकले….वारकऱ्याला थेट मारण्याची धमकी दिल्याचा…

८.एक ओवी आहे, ‘आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी’ संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, ‘जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर’ पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर, कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णु यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे.
९.‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥’
या अभंगाची प्रचीती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनेमाने घेत असतो. नव्हे, तर पंढरीचा विठ्ठल हा वारकर्‍यांचा श्‍वासच आहे. त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते. अशा भगवद्भक्त असलेल्या वारकर्‍यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो.
१०.प्रत्येकाचे कल्याण चिंतणे, कार्यात भगवंताला पहाणे, धर्मपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भागवतधर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तीमय जीवन असते. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचा नामजप आणि उपासना करून एकादशी व्रताचा आध्यात्मिक लाभ घेतला जातो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Significance of ashadhi ekadashi a deep dive into the traditions and spiritual importance of pandharpur s pilgrimage ppd 88 psg
Show comments