नागपूर : रात्री आणि पहाटे थंडी तर दिवसा मात्र उन्हाच्या तीव्र झळा. गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील वातावरण असेच काहीसे झाले आहे. पण आता मात्र उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून कमाल तापमानात वेगाने वाढ होत आहे. तर किमान तापमान देखील वाढायला लागले आहे. मध्य महाराष्ट्र ,मराठवाड्यात किमान व कमाल तापमान चढेच असून येत्या २४ तासात हळूहळू एक ते दोन अंशांनी तापमान घसरण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सध्या वायव्य राजस्थान व परिसरात चक्रकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. दरम्यान राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहत असून उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना बसत आहेत.
राज्यातील थंडी अजूनही पूर्णपणे ओसरलेली नाही. तर तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. बऱ्याच ठिकाणी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यात कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता असून, येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान वाढीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल. विदर्भात कमाल तापमानात मोठा बदल अपेक्षित नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २४ तासात तापमान स्थिर राहणार आहे. मात्र, त्यानंतर तीन ते चार दिवसांत दोन ते तीन अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.
विदर्भात मात्र उलट परिस्थिती राहील, जिथे पुढील तीन दिवस किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मोठा बदल होणार नाही. एकूणच, महाराष्ट्रातील काही भागांत तात्पुरती उष्णता वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर गारवा जाणवेल. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानाचा विचार करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत उन्हाचा चटका अधिक जाणवण्याची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वातावरण उष्ण आणि दमट राहणार आहे. पुढील काही दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे, मात्र काही भागांत सौम्य वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून, आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी कोरडे आणि शुष्क तापमान राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात किमान आणि कमाल तापमान वाढले असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस उन्हाचा प्रभाव जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.