बुलढाणा : गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजत असलेला महायुतीमधील बुलढाणा लोकसभा मतदारसंघाबाबतचा संभ्रम दूर झाला असून ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मिळाल्याचे संकेत आहे. यापूर्वी महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटल्यात जमा आहे. परिणामी, मागील तीन दशकांपासून एकत्र लढणारी शिवसेना आणि लाखो शिवसैनिक आता एकमेकांविरोधात लढणार असल्याने बुलढाण्याचे रणांगण ‘कुरुक्षेत्र’च ठरणार आहे.
‘मिशन-४५’ अंतर्गत भाजपाने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली एक वर्षापूर्वी बुलढाण्यात दावारूपी प्रवास सुरू केला. सहा भेटीत यादवांनी अख्खा मतदारसंघ पालथा घातला. याद्वारे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गट व खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर दवाब निर्माण करण्यात भाजपा यशस्वी ठरली. यामुळे जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरला. मात्र, सलग सहा टर्म (मेहकर विधानसभा व बुलढाणा लोकसभा) मैदान मारणारे खासदार जाधव अविचल राहिले. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या पाठिशी भक्कमपणे राहिले. शेवटी ‘निकालाचे नंतर पाहू, पण बुलढाणा आमचाच’, या शब्दात त्यांनी भाजपाला सुनावल्याचे समजते. यामुळे अंतिम तडजोडीत बुलढाणा आपल्याकडे राखण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे, या घडामोडीत संलग्न शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले. उद्या किंवा परवा शिवसेनेची यादी जाहीर होऊन त्यात जाधव यांचे नाव पहिल्या क्रमांकावर राहील, असा दावाही त्यांनी बोलून दाखविला.
हेही वाचा…अकोला : वेगवेगळ्या यंत्रावर मतदारांना द्यावे लागणार दोन मते; वाचा नेमके कारण काय?
मागील तीन दिवसांपासून खासदार जाधव यांनी बुलढाण्यातील संघपरिवार, ज्येष्ठ भाजप पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे. त्यापूर्वी चिखली, जळगाव जामोद, खामगाव, सिंदखेडराजा या मित्र पक्षांच्या मतदारसंघात विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमीपूजन यांचा धडाका लावला. यामुळे ही जागा शिंदे गटाला मिळणार या चर्चेला पुष्टी मिळाली. आचारसंहितेपूर्वीच्या ‘कॅबिनेट’मध्ये खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठीच्या ५० टक्के वाट्याला मान्यता देऊन मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिले. या सर्व बाबी ही जागा शिंदे गटाला सुटल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जवळपास सुटल्याचे स्पष्ट झाले असून २० मार्चच्या बुलढाणा दौऱ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवाराची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे.
…आता आमने-सामने
बुलढाण्यात शिवसेनेच्याच दोन गटात ‘युद्ध’ होण्याची चिन्हे आहेत. एकप्रकारे ही लढत ठाकरे विरुद्ध शिंदे अशी राजकीय प्रतिष्ठेचे ठरण्याची चिन्हे आहे. २० तारखेपर्यंत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी की भाजप; महायुतीतील गडचिरोलीचा तिढा सुटेना, सोमवारी नावे जाहीर होण्याची शक्यता
असा आहे इतिहास
नव्वदीच्या दशकात अगदी दूरवरच्या बुलढाण्यात एकसंघ शिवसेना फोफावली. १९८९ च्या आसपास मेहकरात झालेली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा जिल्ह्यात सेनेचे भगवे वादळ आणणारी ठरली. तत्कालीन जिल्हा प्रमुख दिलीप रहाटे व त्यांचे सहकारी प्रताप जाधव यांनी सभा लावली होती. याचे प्रत्यंतर १९९० च्या सभेत आले. बुलढाणा (राजेंद्र गोडे) व जळगाव (कृष्णराव इंगळे) हे दोन आमदार निवडून आले. भाजपा सोबतच्या युतीनंतर १९९५ मध्ये विजय शिंदे (बुलढाणा), प्रताप जाधव (मेहकर) हे आमदार झाले. यानंतर सेनेची घोडदौड कायम राहिली. १९९६ मध्ये बुलढाणा लोकसभा पदरी पडल्यावर सेनेने थेट २०१९ पर्यंत बाजी मारली. मात्र, आता पुलाखालून बरेच पाणी नव्हे एकसंघ पुलंच वाहून गेलाय! यंदाच्या लढतीत शिवसेनेची ही शकले एकमेकांविरुद्ध उभी ठाकण्याची दाट शक्यता आहे. असेच झाले तर, किमान जिल्ह्यात खरी सेना कोणती? याचा निर्णय लागणार आहे.