अमरावती : गेल्या काही वर्षात अगोदरच अपेक्षित असलेली नोकर भरती होत नाही आहे. त्यात राज्य सरकार सरकारी नोकरीत खासगीकरण व कंत्राटीकरण करण्याचे पाऊल उचलू पाहत आहे. त्याविरोधात विदर्भ स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी संघ कृती समितीच्या वतीने गुरूवारी येथील संत गाडगेबाबा मंदिरासमोरील प्रांगणातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विद्यार्थ्यांच्या हाती मागण्यांचे फलक लक्ष वेधून घेत होते. मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.
गेल्या ६ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला कंत्राटी पदभरती संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात यावा, सरकारी शाळांचे खासगीकरण रद्द करावे, खासगी यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, राज्यात एमपीएससी सारखा स्वतंत्र व सक्षम आयोग असताना खासगी कंपन्यांना परीक्षेचे कंत्राट का? महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांना माफक शुल्क आकारण्यासाठी राजस्थान पॅटर्न राबवावा, जर १०० रुपये परीक्षा शुल्क भरून जिल्हाधिकारी होत येत असेल तर तलाठी पदासाठी १ हजार रुपये शुल्क का?, नेहमी होणाऱ्या पेपरफुटी संदर्भात कडक कायदे करावे, परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने ठरावीक कालावधीत पूर्ण करण्यात याव्यात, पूर्णक्षमतेनुसार शिक्षक भरती तत्काळ करावी, अधिकृत परीक्षा केंद्रावरच परीक्षा राबविण्यात यावी, कंत्राटी पोलीस भरती रद्द करावी, अशा मागण्या मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी मांडल्या. मोर्चात स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक देखील मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.