लोकसत्ता टीम
नागपूर: सुप्रिया कुमार मसराम आणि त्यांचा ११ वर्षांचा मुलगा शिवांश यांनी एकाचवेळी निर्धरित वेळेच्या आधी आपापले उद्दिष्ट गाठताना इंडिया आणि आशिया रेकॉर्ड्स बुकमध्ये नोंद केली. मायलेकांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुप्रिया यांनी संविधानातील ७५ कलमे तोंडपाठ वाचून दाखविली. त्यांनी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता, पण अवघ्या ६ मिनिटे २१ सेकंदांत उपस्थितांपुढे भराभर कलमे वाचून विक्रम केला. सिव्हील लाईन्स येथील चिटणीस सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याआधी भवन्स स्कूलमध्ये पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या शिवांशने विज्ञानाच्या पुस्तकातील शंभर पानांवर अधोरेखित असलेले शब्द न पाहता उपस्थितांना अवघ्या ८ मिनिटे पाच सेकंदांत अचूक सांगितले. एक ते शंभर पानांचे नंबर उलट- सूलट उच्चारल्यानंतरही पानांवरील मजूकर शिवांशने आत्मविश्वासाने उच्चारला. मोठे होऊन आयएएस अधिकारी बनायची इच्छा शिवांशने व्यक्त केली.
आणखी वाचा-बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे…
आई आणि मुलाचा सत्कार माजी खा. अशोक नेते,डॉ. उदय बोधनकर, राजीव भुसारी, प्रा.डॉ. श्रीराम सोनवणे, इंडिया आणि आशिया बुक रेकॉर्ड्सचे संयोजक डॉ. मनोज तत्ववादी, सुप्रिया यांच्या मेंटर वैशाली कोढे आणि शिवांशच्या मेंटर गौरी कोढे यांच्याहस्ते मायलेकांना मेडल्स, प्रशस्तीपत्र,भेटवस्तु आणि पुष्षगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवांचे वडील कुमार मसराम व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आरजे फरहान यांनी केले.सर्व उपस्थितांना संविधानाच्या प्रास्तविका भेट म्हणून देण्यात आली.विक्रमाची नोंद होताच किशोर बागडे, डॉ. प्रवीण मानवटकर, अजय सोनटक्के, सतीश मेश्राम, गोडबोले, डॉ. संजय जैस्वाल, आनंद शर्मायांच्यासह अनेकांनी आई आणि मुलाचे अभिनंदन केले.
सुप्रिया आणि शिवांश याचे विक्रमासाठी ठरवलेले ध्येय अवघड होते. अत्यंत कमी वेळेत ध्येय गाठण्यासाठी दोघांना खुप मेहनत करावी लागली, संविधान आणि विज्ञानाचे वाचन करावे लागले, त्यामुळेच अत्यंत विक्रमी वेळेत ते वाचून पूर्ण करता आले. नागपूर मध्ये या पूर्वी अनेक क्षेत्रांत विश्वविक्रम झाले. त्याची नोंद वेगवेगळ्या पुस्तकांत घेण्यात आली. मात्र आई आणि मुलाने एकाच वेळी विश्वविक्रमाची नोंद करण ही दुर्मिळ बाब ठरली आहे.