अमरावती : उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहे.त्यामुळे ‘महावितरण’च्या प्रत्येक उपकेंद्राचा विद्युतभार वाढला आहे. अमरावती परिमंडळाअंतर्गत अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात सुमारे २ लाख ७० हजार शेतीपंपधारक शेतकरी आहेत. ‘महावितरण’कडून या शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन शेतीपंप सुरू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेतीपंपांना ‘ऑटो स्वीच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच शेतीपंप आपोआप सुरू होतात. त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होत आहे.शेतीपंपासाठी बसवलेल्या ‘ऑटो स्वीच’मुळे वीज आल्यावर एकाच वेळी सर्व पंप सुरू होऊन विद्युतभार वाढतो. त्याचवेळी रोहित्रावरील (डीपी) दाबही वाढत असल्याने त्यामध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
वीज येताच शेतीपंप आपोआप सुरू होतात. अनेक शेतीपंप असे एकाच वेळी सुरू झाल्याने रोहित्रावरील भार एकाचवेळी वाढतो. त्यामुळे रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. त्यामुळे शेतीपंपांना कॅपेसिटर बसवून ‘ऑटो स्वीच’चा वापर टाळण्याचे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने विद्युतपुरवठा खंडित होतो. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे, तसेच, सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रत्येक शेतीपंपास क्षमतेनुसार कॅपेसिटर बसविणे, हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी सुलभ उपाय आहे.
कॅपेसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा तसेच रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. ऊर्जा वापरात कॅपेसिटर उपकरण महत्त्वाचे आहे. शेतीपंपास कॅपेसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते.कृषीपंपाच्या क्षमतेनुसार कॅपेसिटर लावण्यात आले, तर संबंधित भागातील रोहित्रावरील विद्युत भार २१ ते २४ टक्क्याने कमी होतो.परिणामी रोहित्र निकामी होण्याचे प्रमाण शुन्य होऊन वीज पुरवठा सुरळीत मिळेल.
३ एचपीचे कृषीपंप ४.५ अँपीअर करंट घेत असेल आणि १ केव्हीएआर क्षमतेचा कॅपेसिटर लावल्यानंतर याच कृषीपंपाची करंट घेण्याची क्षमता १ अँपीअरने कमी होऊन ती ३.५ होते. त्याचप्रमाणे ५ एचपी कृषीपंपाला २ केव्हीएआर क्षमतेचा कॅपेसिटर लावल्यानंतर ७.५ अँपीअरचा करंट कमी होऊन ५.८५ होतो. तसेच १० एचपी कृषीपंपाला ३ केव्हीएआर क्षमतेचा कॅपेसिटर लावल्यानंतर कृषीपंपाची करंट घेण्याची क्षमता १५ अँपीअरवरून ११.४ अँपीअर होते.