नागपूर: डिसेंबर महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा आणि विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याने यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत. अत्यंत कमी वेळेत ही कामे करावी लागणार असल्याने त्यात गुणवत्ता राखली जाणार ? की या कामांचे स्वरूपही ‘सी-२०’ निमित्त केलेल्या कामांसारखे राहणार, असा सवाल केला जात आहे.
एक डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूरमध्ये शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यानंतर ७ ते २० डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहेत. अधिवेशनानिमित्त रस्ते, विधिमंडळाची इमारत, आमदार निवास, रविभवन व अन्य ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे केली जात आहेत. यासाठी यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढल्या आहे.
दुसरीकडे राष्ट्रपतींच्या कार्यक्रमानिमित्त शासकीय वैद्याकीय महाविद्यालय, परिसर आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. ही कामे सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी तीन आठवडे ते एक महिन्याचा अवधी आहे. त्यामुळे सर्वच कामे वेगाने पूर्ण करण्याचे मोठे आव्हान कंत्राटदारांवर आहे. मेडिकलमधील कामांसाठी पाच कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत तर विधिमंडळ अधिवेशनासाठी यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी अनेक कामे मोठी आहेत. त्यासाठी साधारणपणे एक महिन्याहून अधिक वेळेची गरज आहे. त्यामुळे वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी त्याच्या दर्जाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ही कामे वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व्यक्त करतात.
हेही वाचा… वायू प्रदूषणामुळे “ब्रेस्ट कॅन्सर” चा धोका
नागपूरमध्ये झालेल्या सी-२० परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने एक महिन्यात शहर सौंदर्यीकरणाचे शेकडो कामे पूर्ण केली होती. मात्र, ही परिषद संपल्यावर या कामातील फोलपणा उघड झाला होता. यावर अनेक आरोपही झाले होते. परंतु, त्याची चौकशी झाली नाही. नागपूर अधिवेशनाच्या कामावर दरवर्षी उधळपट्टीचे आरोप केले जातात. मागील काही वर्षांपासून कामाच्या निर्धारित किंमतीपेक्षा कमी दराने कंत्राटदारांकडून निविदा भरल्या जात आहेत. यामुळे सरकारच्या पैशाची बचत होत असल्याचा दावा केला जात असला तरी कामाच्या दर्जावरही शंका घेतली जात आहे.
नागपूर सिटीझन्स फोरमचे म्हणणे
नागपूर सिटीझन्स फोरमचे अभिजित झा याबाबत म्हणाले, आजही शहरातील अनेक भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यासाठी नागरिक संघर्ष करीत आहेत. कधी निधीचे तर कधी अन्य कारणे देऊन ही कामे टाळली जातात. मात्र, दरवर्षी होणारे अधिवेशन व अतिविशिष्ट लोकांच्या दौऱ्याच्या निमित्ताने रस्ते दुरुस्ती व तत्सम कामे केली जातात. या कामांची गुणवत्ता तपासणी कधीही होत नाही. करदात्यांच्या पैशातून हा खर्च केले जात असल्याने याचे अंकेक्षण होणे गरजेचे आहे