चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठातील ३० प्राध्यापकांचे भरती प्रकरण, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावर १ कोटी ९ लाखांचा खर्च तसेच अदृश्य क्रीडांगण या तीन प्रकरणात कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. मात्र दोन वर्षात या चौकशी समितीची एकही बैठक झालेली नाही किंवा साधा अहवाल देखील सादर केला नसल्याचा आरोप सिनेट सदस्य डॉ.दिलीप चौधरी, प्रा.निलेश बेलखेडे यांनी केला आहे. उलट कुलगुरूंसाठी स्वतंत्र वाहन असतांना ८३ हजार रूपये महिना भाड्याने इनोव्हा गाडी घेवून विद्यार्थ्यांच्या सामान्य फंडातून आर्थिक लुट चालविली असाही आरोप केला.

गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून सर्व मनमानी कारभार व गोंधळ सुरू आहे. विद्यापीठात ३० प्राध्यापकांची भरती केली गेली. विद्यार्थी नाही, मात्र प्राध्यापक आहे अशी स्थिती असलेल्या या विद्यापीठात आतापर्यंत या प्राध्यापकांना १ कोटी ८९ लाख रूपयांचे मानधन विद्यार्थी फंडातून दिले गेले. या प्राध्यापकांच्या भरतीला अजूनही शासनाची मान्यता नाही. अशात या प्राध्यापकांना पगार दिला गेला. यातील ८९ लाख प्राध्यापकांकडून वसूल केले गेले मात्र १ कोटी अजूनही थकीत आहे. यासंदर्भात चौकशी समिती गठीत केली आहे. परंतु या चौकशी समितीची एकही बैठक झाली नाही. कुलगुरू माहितीच देत नसल्याचा आरोप डॉ.चौधरी व प्रा.बेलखेडे यांनी केला. २०२३ मध्ये दिक्षांत समारोहाला राष्ट्रपती प्रमुख अतिथी होत्या. सदर कार्यक्रमावर १ काेटी ९ लाख रूपये खर्च केले. हा खर्च दहा पट अधिक आहे. त्यासाठी ६० लाखांचा वातानुकूलित मंडप उभारला गेला. या प्रकरणात देखील चौकशी लावण्यात आली. मात्र या चौकशी समितीची बैठक झाली नाही किंवा अहवाल देखील सादर केला नाही.

विद्यापीठात एक क्रिडांगण उभारले गेले. आता त्याच क्रिडांगणावर इमारत बांधण्यात आली. यात मोठा भ्रष्टाचार झाला. यासाठीही चौकशी समिती गठीत झाली. परंतु अहवालाचे काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे. विद्यापीठात कुलगुरूंची मनमानी सुरू आहे. कुलगुरूंनी दोन सिनेट सदस्यांना सोबत घेत ऑस्ट्रेलियाचा अभ्यास दौरा केला. लाखोंचा प्रवास खर्च करून या दौऱ्यात नेमका कोणता अभ्यास केला हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. आता तर कुलगुरूंनी एक वाहन असतांना नव्याने इनोव्हा वाहन ८३ हजार रूपये प्रति महिना किरायाने घेतले आहे. अन्य सहा वाहनांवर दुरूस्तीसाठी वर्षाला ५ लाख ७० हजार रूपयांचा खर्च होत आहे. वाहन असतांनाही नविन वाहनासाठी अट्टाहास का असाही प्रश्न सिनेट सदस्यांनी उपस्थित केला आहे. कुलगुरू यांच्याकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ पायदळी तुडविला जात आहे.

माहिती अधिकारात दोन वर्षापासून अर्ज प्रलंबित असतांना माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रा.निलेश बेलखेडे यांनी विद्यापीठ व उपकेंद्रात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा व परिसराला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. मात्र हा प्रस्तावच कुलगुरूंनी नाकारला. कुलगुरूंना शिवाजी महाराज यांच्या नावाचा विरोध आहे का असाही प्रश्न प्रा.बेलखेडे यांनी उपस्थित केला आहे.नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या अश्वमेघ राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेच्या निविदा प्रक्रियेत मोठा घोळ केल्याचा आरोपही केला. या सर्व प्रकरणाची तक्रार राज्यपाल व शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. कुलगुरूंचा असाच मनमानी कारभार सुरू राहिला तर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा डॉ.चौधरी व प्रा.बेलखेडे यांनी दिला आहे.

” सर्व आरोप चुकीचे आहेत. कुलगुरूंना सातत्याने प्रवास करावा लागतो, जुनी गाडी नादुरूस्त आहे. अपघात झाला तर जबाबदार कोण? . गरज होती म्हणूनच गाडी किरायाने घेतली. कुठलेही नियमबाह्य काम केलेले नाही. नियमाप्रमाणे सर्व प्राधिकरणाची मान्यता घेतली . सर्व कामे कायद्यानुसार व नियमानुसारच आहेत.” डॉ.प्रशांत बोकारे कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ

Story img Loader