अमरावती: दिवंगत सामाजिक कार्यकर्त्‍या सिंधुताई सपकाळ यांच्‍या खासगी सचिवाने स्‍वत:च्‍या नावामागे सिंधुताईंचे नाव लावून त्यांचा वारस होण्‍याचा प्रयत्‍न चालवला आहे, असा आक्षेप सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरूण सपकाळ यांनी घेतला आहे. या प्रकरणी त्‍यांनी अचलपूर येथील न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंधुताई सपकाळ यांचे खासगी सचिव विनय नितवणे हे पुण्‍यातील संस्‍थेचा कारभार पाहतात. सिंधुताई सपकाळ यांचे ४ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले. त्‍यांच्‍या निधनानंतर विनय नितवणे यांनी स्‍वत:च्‍या नावात बदल करून राजपत्राद्वारे नावामागे सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावले आहे. जी मुले अनाथ आहेत, अशाच मुलांच्‍या नावांमागे सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावले जाते. मात्र, विनय नितवणे हे अनाथ नाहीत, तरीही त्‍यांनी आपल्‍या आईचे नाव लावले आहे. त्‍यांच्‍या नावाचा दुरूपयोग होण्‍याची शक्‍यता असल्‍याने आपण न्‍यायालयात दाद मागण्‍याचा निर्णय घेतला, असे अरूण सपकाळ यांनी ‘लोकसत्‍ता’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा… विजयी जल्लोषानंतरचा ‘राडा’ भोवला, २३ कार्यकर्त्यांविरुद्ध दंगलीचा गुन्हा…

विनय नितवणे यांनी सिंधुताई सपकाळ यांच्‍या संस्‍थेत काम करावे, समाजकार्य करावे, यासंदर्भात आमचा कुठलाही आक्षेप नाही. मात्र ते अनाथ असताना त्‍यांनी स्‍वत:च्‍या नावामागे सिंधुताईंचे नाव लावले, यावर तीव्र आक्षेप असल्‍याचे अरूण सपकाळ म्‍हणाले. विनय नितवणे हे सिंधुताईंसोबत रहायचे. सिंधुताईंमुळे त्‍यांच्‍या अनेकांशी ओळखी झाल्‍या आहेत. आता सिंधुताईंचे नाव लावून विनय नितवणे यांना नेमके काय साध्‍य करायचे आहे, असा प्रश्‍न देखील अरूण सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी सर्वात आधी आपण मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर उच्‍च न्‍यायालयाने आधी खालच्‍या न्‍यायालयात याचिका दाखल करावी, असे स्‍पष्‍ट केल्‍यावर आता अचलपूर येथील न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे, असे अरूण सपकाळ यांनी सांगितले. अरूण सपकाळ हे चिखलदरा येथे सिंधुताई सपकाळ यांनी स्‍थापन केलेल्‍या अनाथ मुलींच्‍या आश्रमाची व्‍यवस्‍था पाहत आहेत.
सिंधुताई सपकाळ यांच्‍या नावाचा गैरवापर करून अनेकांनी फसवणूक होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे आपण पुणे जिल्‍हाधिकारी कार्यालयात देखील तक्रार दाखल करणार असल्‍याचे अरूण सपकाळ यांनी सांगितले.

गैरसमजातून झालेला प्रकार

सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावल्‍यावरून अरूण सपकाळ यांनी आपल्‍यावर घेतलेला आक्षेप हा गैरसमजातून घडलेला प्रकार आहे. हा केवळ कौटुंबिक वाद आहे. मी लहानपणापासून सिंधुताई सपकाळ यांच्‍यासोबत आहे. मी सिंधुताईंचे नाव लावल्‍याने अरूण सपकाळ हे नाराज झाले. ही नाराजी लवकरच दूर होईल, असे स्‍पष्‍टीकरण दिवंगत सिंधुताई सपकाळ यांचे खासगी सचिव विनय नितवणे यांनी दिले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhutai sapkal son arun sapkal has objected that the private secretary of sindhutai sapkal has tried to become her heir mma 73 dvr