बुलढाणा : महायुतीमधील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सोमवारी रात्री उशिरा सुटल्याचे चित्र समोर आले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत झालेल्या कथित चर्चेअंती शिंदे गटाने माजी आमदार शशिकांत खेडेकर यांना ‘एबी फॉर्म’ दिला. यामुळे सिंदखेड राजा मतदारसंघातील युतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याची चर्चा रंगली असतानाच आज शिंदे सेनेच्या उमेदवारासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गटा)च्या उमेदवारानेही आपापल्या पक्षांच्या ‘एबी फॉर्म’सह अर्ज भरल्याने मोठाच राजकीय गोंधळ उडाला.
महायुतीमधील या ‘एबी फॉर्म’च्या महानाट्यामुळे सिंदखेड राजात आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असून महायुतीत महा पेच तयार झाला आहे. आता यापैकी कोणता मित्र माघार घेतो याकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>> माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांची ‘वंचित’ला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये जाणार ?
आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने माजी आमदार शशिकांत खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातर्फे काँग्रेसचे युवा नेते मनोज कायंदे यांनी अगदी आपापल्या पक्षाच्या ‘एबी फॉर्म’ उमेदवारी अर्ज भरले. वाजतगाजत आणि बऱ्यापैकी शक्ती प्रदर्शन करून दोन्ही मित्र पक्षातर्फे अर्ज दाखल करण्यात आले आहे . यामुळे युतीतील तिढा सुटला अशी काल रात्रीची स्थिती असताना तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला असे चित्र आज दिवसा दिसून आले. आज मंगळवारी, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी हे ‘एबी फॉर्म’ नाट्य रंगले आणि त्याने युतीच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली.याचे पडसाद आता मुंबई ते बारामती पर्यंत उमटण्याची पुरेपूर शक्यता आहे.
हेही वाचा >>> खुशी के आंसू! उमेदवारी मिळताच आमदारांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले…
रात्रीस खेळ चाले…
गेल्या कित्येक दिवसांपासून महायुतीमध्ये सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुरू होता. या जागेसाठी आग्रही असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्याची चर्चा सुरू होती. काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी आमदार शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी जाहीर करीत त्यांना ‘एबी फॉर्म’ सुद्धा दिला. यामुळे शिंदे गटाने जल्लोष साजरा केला. रात्री उशिरा खेडेकर मोजक्या समर्थकांसह सिंदखेड राजा कडे रवाना झाले. दुसरीकडे याची खबर लागताच राष्ट्रवादी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या . दस्तुरखुद्द अजितदादा आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जिल्ह्यतील विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा केली. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सिंदखेड राजाचे निवासी असलेले जिल्हाध्यक्ष अडव्होकेट नाझेर काझी यांच्याशी थेट संवाद साधत ‘उद्या अर्ज भरण्याच्या तयारीत राहण्याचे’ आदेश दिले. विशेष दूता द्वारे रातोरात पक्षाचा ‘एबी फॉर्म’ पाठविण्याची व्यवस्था केली. आज उत्तररात्री हे दूत बंदोबस्तत सिंदखेड राजात दाखल झाले. आज मूळचे काँग्रेसचे मनोज कायंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. शिंदे गटाचे खेडेकर यांनीही अर्ज भरला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली असून महायुतीमध्ये वादळ उठण्याची शक्यता आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे हा पेच कायम राहतो काय? आणि शिंदे सेना की अजित पवार गट यापैकी कोण माघार घेतात हे पाहणे मनोरंजक ठरले आहे.