नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता काही दिवस उरले असून विविध पक्षांचे नेते नागपूर आणि विदर्भात सभा घेत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आज नागपुरात आले. दोन लाख कोटींची गुंतवणूक असलेले प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आले असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
नागपूरच्या बुटीबोरी आणि मिहानमध्ये प्रस्तावित दोन मोठे प्रकल्प गुजरातला गेले. तेथे त्या प्रकल्पांचे भूमिपूजनही झाले आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा सेमिकंडक्टर्सचा १ लाख ५४ हजार हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेला आहे. हा प्रकल्प बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये प्रस्तावित होता. तसेच टाटा-एअरबस’चा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर २०२४ ला वडोदरामध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. भारतीय वायूदलासाठी मालवाहू विमान बवनण्याचा हा प्रकल्प २१,९३५ कोटी रूपयांचा आहे. नागपूरमधील मिहान परिसरात हा प्रकल्प बनवण्यात येणार असल्याची चर्चा होती. “हा प्रकल्प नागपूर येथे होईल,” असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते.
हेही वाचा…निवडणुकीच्या तोंडावर ऑटोरिक्षाचे चाके थांबणार? संयुक्त कृती समिती म्हणते…
याबाबत सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक दिली. महाराष्ट्रात येऊ घातलेले २ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प गुजरातमध्ये त्यांनी पळवले. हा महाराष्ट्रातील जनतेसाठी, मराठी माणसाकरिता सर्वांत मोठा मुद्दा आहे. येथील जनता केंद्रातील भाजप सरकारविरोधात आक्रोषित असून महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने विजयी होईल, असे ते म्हणाले. ज्या प्रकारे भाजपच्या नेत्यांकडून प्रचारात द्वेषाची भाषा वापरली जात आहे. त्याला महाराष्ट्रातील जनता मतपेटीतून उत्तर देईल, असेही संजय सिंह म्हणाले. तसेच त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटोगे तो कटोगे’ याला प्रतिउत्तर देताना ‘ना बटीए, ना कटीए, मिलकर बीजेपी को रपटीए’ अशी घोषणा दिली.
हेही वाचा…नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
महाराष्ट्रात प्रचार करताना आदित्यनाथ यांनी हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी ही घोषणा दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ अशी घोषणा दिली. तीच री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रचारादरम्यान ओढली आहे. परंतु माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे या घोषणेची आवश्यकता नसल्याचे म्हटले. त्यानंतर त्यांनी आपण कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नसल्याचा खुलासा केला. दरम्यान दिल्लीला प्रदूषणाचा विळखा आहे. त्याबद्दल संजय सिंह यांनी, आम आदमी पक्षाने प्रदूषण कमी करण्यासाठी भरपूर काम केले आहे, अशी प्रतिक्रिया दिली.