नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत एका महिला सुरक्षारक्षकाला एसआयएस कंपनीच्या एका व्यवस्थापकाने शारीरिक संबंधाची मागणी केली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरक्षा अधिकारी धनराज लक्ष्मणराव चौधरी (४२, पिपळा, हुडकेश्वर) याला अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगण्यात राहणारी ३६ वर्षीय विवाहित महिला साई इंटरनशनल सिक्युरिटी कंपनीत (एसआयएस) सुरक्षारक्षक पदावर कार्यरत आहे. ती हिंगण्यातील फ्लिपकार्ट कंपनीच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहे. एसआयएस कंपनीची सुरक्षारक्षक धनराज चौधरी हा विकृत असून महिला सुरक्षारक्षकांना नेहमी त्रास देत होता. अनेकींना तो शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. त्यासाठी त्याचा पर्यवेक्षक मंगेशची मदत घेत होता.
हेही वाचा >>>नागपूर: अल्पवयीन मुलीवर तिच्या आईसमोरच लैंगिक अत्याचार…
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास धनराज चौधरी याने मंगेश आणि नितीनच्या मदतीने पीडित महिलेला फोन करून बोलावले. ‘तुला नोकरी करायची असल्यास शारीरिक संबंध ठेवावे लागतील. संबंध न ठेवल्यास नोकरीवरून काढून टाकणार’ अशी धनराजने धमकी दिली. तिने संबंधास नकार दिला आणि निघून गेली.पीडितेने घडलेला प्रकार सहकारी महिला सुरक्षारक्षकाला सांगितला. धनराजने त्या महिलेच्यासुद्धा खांद्यावर हात ठेेवल्याचे सांगितले. त्यामुळे दोघींनीही पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. काही वेळातच हिंगणा पोलीस पोहचले. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून धनराज चौधरीला अटक केली.