लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: पुस्तके आणि शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी जात असलेल्या बहीण भावाच्या दुचाकीच्या आडवी गाय आल्याने अपघात झाला.

या अपघातात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या बहिणीच्या अंगावरून भरधाव मिक्सर वाहनाचे चाक गेले. बहिणीचा भावाच्या डोळ्यासमोरच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बुटीबोरी एमआयडीसी परिसरात घडली. तनिशा निळकंठ कावळे (१७) असे मृत बहिणीचे तर गौरव निळकंठ कावळे (२१) दोघेही रा. टाकळघाट, ता. हिंगणा असे जखमी भावाचे नाव आहे.

आणखी वाचा-नागपूर-हैदराबाद मार्ग बंद, वाहनांच्या रांगा; मदत व पुनर्वसन मंत्री यवतमाळात दाखल

तनिशा ही हुडकेश्वर नागपूर येथील सेंट पॉल स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकायची तर गौरव बाहेरगावी कृषी महाविद्यालयात शिकतो. गौरवला सुटी असल्याने तो गावी आला होता. तनिशाला पुस्तके हवी असल्याने ते खरेदी करण्यासाठी दोघेही दुचाकीने एमआयडीसी परिसरातून दुकानाकडे जात होते. त्यांच्या दुचाकीसमोर अचानक धावत गाय आडवी गेली. त्यामुळे गौरवचा ताबा सुटला आणि दुचाकीची गायीला धडक लागल्याने दोघेही रोडवर कोसळले.

गौरव जखमी झाला तर तनिशा मिक्सर वाहनच्या चाकाखाली आली. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी मिक्सर मशीन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sisters death in front of brother in nagpur adk 83 mrj