लोकसत्ता टीम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. सोमवारी गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी याबाबत विधासभेत घोषणा केली. भाजप नेते व माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

लक्षवेधीच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वी मुनगंटीवार यांनी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. लक्षवेधी सूचनेवर निवेदन करताना मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की त्याची कल्पनाही न केलेली बरी. ग्राहकांच्या खात्यातून पैसे गायब होतात. नोकरभरतीमध्ये पैसे खाल्ले जातात. आरक्षण हद्दपार केले जाते. तरीही कारवाई होत नाही.

१७ मार्च २०२५ ला सुप्रीम कोर्टानेने जो निकाल दिला, त्यानुसार ज्या खातेधारकांची चूक नसताना पैसे काढले जात असतील तर त्यावेळी बॅंकेने त्वरित त्यांचे पैसे भरून द्यायचे असतात. यामध्ये पैसे खाता आले नाही, म्हणून फायर वॉल करण्यात आली नाही. सर्वस्वी चूक ही बॅंकेचे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी व संचालकांची आहे. भ्रष्टाचार किती खालपर्यंत पोहोचला आहे, याची कल्पना यावरून यावी की, यांचे रक्त जर पॅथॉलॉजीमध्ये तपासायला गेले तर रक्ताच्या थेंबातून हिमोग्लोबीन सापडणार नाही. तर फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच सापडेल, असे आ.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

पुढे म्हणाले, आज संविधानावर आपण चर्चा करणार आहोत. संविधानाने, न्यायालयाने आणि शासनानेही सांगितले आहे की आरक्षण असले पाहिजे. पण चंद्रपूर जिल्हा बॅंकेमध्ये आरक्षण धुडकावून लावण्याचा महाप्रताप संचालक मंडळाने केला आहे. दिव्यांग, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचे आरक्षण असले पाहिजे. पण यांपैकी कुणालाही आरक्षण दिले गेले नाही. जी नोकरभरती केली, त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला अशी माहिती मिळाली. परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. पैसे खाऊन नोकरभरती केल्यामुळे काही संघटनांनी उपोषण केले. त्यानंतरही भ्रष्ट लोकांना पाझर फुटला नाही. या प्रकरणात एसआयटीची चौकशी लावणार का, असा प्रश्न आमदार मुनगंटीवार यांनी केला.

एसआयटी लावताना त्याची कार्यकक्षा ठरवली गेली पाहिजे. यामध्ये आमच्या सर्व सदस्यांसोबत चर्चा झाली पाहिजे. तेव्हा कुठे ‘दूध का दूध, पानी का पानी’, होईल.ही चौकशी लावताना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने लावा, असेही आ . मुनगंटीवार म्हणाले.

गृहराज्यमंत्री म्हणाले एसआयटी लावणार

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नांना उत्तर देताना गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे खाते हॅक करून ३३ ग्राहकांचे ३ कोटी ७० लाख ६४ हजार रुपये एका अज्ञान व्यक्तीने हरियाणाच्या खात्यात वळते केले. यासाठी आणि नोकरभरतीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी एसआयटी लावण्यात येईल. आमदार मुनगंटीवार यांच्या सुचनेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने ही चौकशी लावण्यात येईल.