नागपूर : नागपुरातील दंगलींचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे .सीसीटीव्ही फुटेज आणि समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून माहिती घेऊन पोलीस संशयित आरोपींची धरपकड करीत आहेत. आतापर्यंत कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलीस ठाण्यात तब्बल १२५० संशयित आरोपींविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी २०० आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून ६० जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा कसून शोध घेतल्या जात आहेत.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करीत औरंगजेबच्या प्रतिकात्मक कबरीवर हिरव्या रंगाची चादर टाकून जाळली. त्यामुळे रविवारी दुपारच्या सुमारास महालच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन झाले होते. त्यानंतर समाज माध्यमांवर विविध अफवा पसरल्या व सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत संघर्ष झाला. काही समाजकंटकांनी या वादात प्रवेश केला व भालदापुरा, हंसापुरीत अनेक वाहनांची जाळपोळ केली. सोबतच शंभरावर वाहनांची तोडफोड करीत पोलिसांवरदेखील दगडफेक केली. त्यात ३५ हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. अतिरिक्त कुमक मागवत भालदारपुरा, चिटणीस पार्क येथील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली. कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले. या प्रकरणात तीन पोलीस ठाण्यांत एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.
एफआयआरच्या प्रतीनुसार फहीम खान शमीम खानने (३८, संजयबाग कॉलनी, यशोधरानगर) विहिंप-बजरंग दलाच्या आंदोलनानंतर ५० ते ६० जणांचा बेकायदेशीर जमाव जमवला व गणेशपेठ पोलीस ठाण्यात धडक दिली. त्याच्या तक्रारीवरून आंदोलन करणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फहीम खान शमीम खान याच्यासोबत सैफ अली खान रौफ खान (२८, वाठोडा), शेख नादीम शेख सलीम (३५, यशोधरानगर), मोहम्मद शाहनवाज रशीद शेख (२५, पारडी), मोहम्मह हरीश उर्फ मोहम्मद इस्माईल (३०, गांधीबाग), युसूफ शेख उर्फ अब्दुल हफीज (२५, महाल), शेख सादीक शेख नबी (४१, महाल), मो.युसूफ उर्फ अब्दुल हफीज शेख (महाल), आसीम शेख समशुज जमा (२४, भालदारपुरा) हेदेखील होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला व शांतता ठेवण्याबाबत समज देण्यात आली होती.
१०० सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
दंगलग्रस्त परिसरातील जवळपास १०० सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये दिसणाऱ्या संशयितांची माहिती पोलिसांनी गोळा केली. सीसीटीव्ही फुटेजमधील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेणे सुरु केले. जवळपास २०० आरोपींची ओळख पटवली आहे. ६० आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे.त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.