नागपूर : उमरेडमधील एमएमपी कंपनीतील स्फोटात शुक्रवारी (११ एप्रिल २०२५) मोठ्या भावाचा मृत्यू झाला होता. चार दिवसांनी या स्फोटात गंभीर जखमी लहान भावाचाही नागपुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील एकूण बळींची संख्या सहावर गेली आहे. घरातील दोघेही तरुण मुले दगावल्याने आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते.

करण तुकाराम शेंडे (२०) असे मंगळवारी सकाळी १० वाजता नागपुरातील ओरियस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या खासगी रुग्णालयात दगावलेल्या रुग्णाचे नाव आहे. त्याचे शवविच्छेदन मेडिकलमध्ये केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द केला गेला. ११ एप्रिलला उमरेडमधील एमएमपी कंपनीतील स्फोटात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला प्रथम मेडिकल व त्यानंतर खासगी रुग्णालयात हलवले गेले होते. ११ एप्रिलला कंपनीतील स्फोटात त्याचा मोठा भाऊ निखिल तुकाराम शेंडे (२५) याचा मृत्यू झाला. या घटनेत ३ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघांचा मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता एकाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दुसऱ्या भावाचाही मृत्यू झाल्याची माहिती गोंडबोरी या शेंडे कुटुंब राहत असलेल्या गावात पोहचल्यावर तेथे शोककळा पसरली. नागपुरातील खासगी रुग्णालयात स्फोटातील गंभीर भाजलेल्या सहा रुग्णांवर उपचार सुरू असून एक रुग्ण हा जीवनरक्षण प्रणालीवर आहे.

नोकरीसोबतच घेत होते पदवीचे शिक्षण

निखिल आणि करण शेंडे यांचे आई-वडील दोघेही शेतमजूर होते. दोघेही सकाळी दोन्ही मुलांचा डबा तयार करून शेतमजुरीच्या कामावर निघून जात होते. दोघे भाऊ उमरेडमधील धुरखेडा येथील एमएमपी कंपनीत १० किलोमीटर सोबत दुचाकीवर जात होते. दोघेही भाऊ नोकरीसोबतच पदवीचे शिक्षणही घेत असल्याची माहिती मेडिकलमध्ये शवविच्छेदनासाठी आलेल्या नातेवाईकांनी दिली.

प्रकरण काय?

नागपुरातील उमरेड एमआयडीसी परिसरातील कंपनीत ११ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता स्फोट झाला होता. ही माहिती मिळताच पोलिस यंत्रणा, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या कामगारांना प्रारंभी उपचारासाठी उमरेडच्या खासगी रुग्णालयात व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल केले होते. रात्री उशिरा बहुतांश जखमी कामगारांना नागपूर येथे आणण्यात आले. त्यापैकी दोघांचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. तर तिघे कंपणीतच दगावले. मेडिकलच्या रुग्णांना नंतर खासगी रुग्णालयात हलवले गेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.