बुलढाणा : जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, आरक्षणाच्या मागणीला पाठींबा आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोताळा तालुक्यातील समाज बांधवही सरसावले आहेत.
आजपासून सहाजणांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून त्यांना पाठींबा म्हणून तालुक्यातील समाज बांधव दररोज साखळी उपोषण करणार आहेत. मोताळा येथे आज ८ सप्टेंबरपासून स्थानिक बस स्थानक परिसरातील डॉ. महाजन यांच्या हॉस्पिटलजवळ बेमुदत उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे. सुनील कोल्हे, रावसाहेब देशमुख, अमोल देशमुख, शुभम घोगटे, निलेश सोनुने व ओमप्रकाश बोरडे यांनी उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा – चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी होणार पायलट, फ्लाईंग क्लबची लवकरच निर्मिती
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती समाज बांधवांच्या वतीने देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सदरच्या उपोषणाला पहिल्याच दिवशी विविध सामाजिक संघटना या पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या. उपोषण मंडपात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.