इयत्ता बारावीच्या गणित विषयाच्या पेपरफुटीचा तपास साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आज पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधाराचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे.३ मार्च रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगांव येथील भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयावरील परिक्षा केंद्रावर बारावीचा गणिताचा पेपर सुरू होण्यापूर्वीच समाज माध्यमावर सार्वत्रिक झाला होता. शुक्रवारी सिंदखेडराजा पोलिसांकडे पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, राजेगाव येथील वादग्रस्त केंद्रावरून पेपर सार्वत्रिक झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा आज ४ मार्चला साखर खेर्डा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
हेही वाचा >>>नागपूर: देशातील ११ राज्यांतील २५० विद्यार्थ्यांची नागपूर मेट्रोतून सफर
रंगनाथ गावडे यांनी ४ परीक्षा केंद्रावर भेट देऊन तपासणी केली असता राजेगांव येथील भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयावरील परीक्षा केंद्रावर हा घोळ झाल्याचे आढळून आले. साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे, हवालदार नितीश राजे जाधव, जमादार रामदास वैराळ यांनी शेंदूर्जन, किनगाव जट्टू, बिबि येथील सहा जणांना आज ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार तपासावर करडी नजर ठेवून आहे. दरम्यान, या पेपरफुटीत काही शिक्षकही आरोपी होउ शकतात असा प्राथमिक अंदाज आहे.