लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : तांबे चोरीच्या प्रकरणात समुद्रपूर पोलिसांनी आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ठेवत सहा पोलिसांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. समुद्रपूर येथील ठाणेदारपेक्षा पोलीस शिपाईच अधिक कारभारी व शिरजोर झाल्याची सातत्याने चर्चा होत होती. एका आठवड्यापूर्वी एक प्रकरण घडले होते.

चोरीचा माल असलेले एक वाहन पोलिसांनी जप्त केले होते. हे वाहन एकाने नंतर सोडून दिले होते. या प्रकरणाची चाहूल पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना लागली. त्यांनी लगेच चौकशी करीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात जोडण्याची कारवाई केली. तांब्याच्या तारेची चोरी करून ती विकणारी टोळी उधम करीत हाती. त्यातच चोरीचे वाहन हाती लागल्याने कारवाई अपेक्षित होती. मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ते वाहन ठाणा परिसरात लावले आणि मग परस्पर आर्थिक व्यवहार करीत सोडून दिले.

आणखी वाचा-यवतमाळ : कोलकत्ताच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ने घाटंजीत थाटला दवाखाना, अडकला अन् सुटलासुद्धा…

कारवाई केलीच नाही. हे वाहन जप्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची सुट्टी असल्याने तो निघून गेला. प्रकरण गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आले होते. मात्र त्यांनी पुढील तपास न करता चालक व वाहन सोडून दिले. तसेच पोलीस ठाण्याच्या डायरीवर किंवा अन्य स्वरूपात चोरीच्या वाहनबाबत कुठलीच नोंद केली नाही. ही गंभीर बाब ठरली. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक हसन यांनी कारवाईचा बडगा उगारला. प्रमोद थूल, समीर कुरेशी, प्रमोद जाधव, सचिन शेंडे, सचिन भालशंकर, वैभव चरडे या सहा पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे.

या धडक कारवाईने वर्धा पोलीस यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे. या कारवाईपूर्वी दोन शिपायांना प्रथम पोलीस मुख्यालयाशी संलग्न करण्यात आल्याची माहिती आहे. समुद्रपूर पोलीस ठाणे विविध कारणांनी यापूर्वी वादग्रस्त ठरत आले आहे. या परिसरात डीबी पथकाने अवैध दारू वाहून नेणाऱ्या गाड्या, चोरीच्या रेतीचे टिप्पर पकडण्याच्या अनेक कारवाया केल्या.

आणखी वाचा-अमरावती : आमदार बच्‍चू कडू यांच्‍या जीवाला धोका, जिल्‍हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र…

मात्र त्या प्रकरणात कारवाई केलीच नसल्याची गावात चर्चा होते. दहेगाव, वाघेडा, शेडगाव चौकात वाहनांची धरपकड झाली मात्र कारवाई उमटली नसल्याचे म्हटल्या जाते. ठाणेदार कारवाई करतात पण विविध बीट जमादार मात्र आपापल्या हद्दीत अवैध प्रकरणाकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करतात. आता तब्बल सहा शिपायांवर कारवाई झाल्याने पोलीस दल हादरून गेल्याचे चित्र आहे. आठ वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध दारुसाठा प्रकरणात ठाणेदारसह पाच पोलिसांना निलंबित करण्याची कारवाई केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six police personnel hastily suspended for financial transactions in copper theft case pmd 64 mrj