वर्धा : साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांसाठी अपेक्षित मंडप तयार झाले असून एकाचवेळी सहा स्वतंत्र मंडप असणारे हे इतिहासातील पहिलेच संमेलन ठरणार आहे. संमेलनाचे मंडप उभारण्याचे काम विक्रमीवेळेत पूर्ण झाले आहे. मुख्य सभामंडपासह सहा सभामंडप विक्रमीवेळेत पूर्ण करण्यात आले आहे. पुस्तक प्रकाशनासाठी प्रथमच स्वतंत्र सभामंडप देण्यात आला आहे. २३ एकरच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या मुख्य सभामंडप साडेसात हजार आसनक्षमतेचा असून त्यास आचार्य विनोबा भावे सभामंडप, असे नाव देण्यात आले आहे. मनोहर म्हैसाळकर सभामंडप पाच हजार आसनक्षमतेचा राहणार. इतर चार मंडप तीन हजार आसनक्षमतेचे आहे.
संमेलनात एक मंडप बालकांच्या साहित्यासाठी असून तीनशे ग्रंथदालने उभी झाली आहे. मुख्य सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. संमेलनाचे मुख्य प्रवेशद्वार ८३ बाय ३५ फुटाचे असे भव्यदिव्य राहणार असून आकर्षक स्वरूपात त्याची मांडणी होत आहे. विविध दालने, भोजन कक्ष व अन्य कामे पूर्ण झाली आहे. साहित्यनगरीचे नाव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावे आहे. या नगरीचे रचयिता असलेले अभियंता महेश मोकलकर म्हणाले की, संमेलन देखणे व्हावे असा प्रयत्न आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक साहित्यप्रेमीस काहीतरी वेगळेपण जाणवावे, असा प्रयत्न आहे. दालनाच्या मांडणीत नाविण्य दिसेल, सर्व मंडप वाटरप्रुफ व भक्कम आहे.