अमरावती: शहरात अकरावीच्‍या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आठ फेऱ्या पूर्ण झाल्‍या असून अजूनही सहा हजार जागा रिक्‍त असल्‍याने अनेक कनिष्‍ठ महाविद्यालयांच्‍या अडचणीत भर पडली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश मिळू न शकलेल्या अथवा प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेशाची संधी मिळणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील १६ हजार १९० जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. आतापर्यंत तीन नियमित तर पाच विशेष फेऱ्या झाल्या आहेत. दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या टप्प्यात प्रवेश देण्यात आला. आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्‍यांनी विविध शाखांमध्‍ये प्रवेश घेतले आहेत, पण अजूनही ६ हजार जागा रिक्त आहेत.

हेही वाचा… दोन्ही खिशात पैसे तर एकाच खिशातील कसे लुटले? पोलिसांचा तर्क अन् बनाव उघड

पहिल्‍या काही फेऱ्यांमध्ये प्रवेशासाठी लगबग बघायला मिळाली असली तरी विशेष फेऱ्यांमध्ये प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटत गेली. त्‍यामुळे ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्‍याचे शिक्षण विभागाने सुद्धा जाहीर केले आहे. आणखी काही विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असतील त्यांनी प्रवेशाच्या पोर्टलवर अर्जाचा भाग एक व भाग दोन भरून ठेवण्याच्‍या सूचना शिक्षण विभागाने दिल्‍या आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यांना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकरावी प्रवेशाची शेवटची संधी दिली जाणार असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे.

हेही वाचा… रोजगार हमी योजनेत महिलांचा वाढता सहभाग

सध्या शिकवणी वर्गाचे लोण सर्वत्र पसरले असून अकरावीचा प्रवेश हा नाममात्र राहिला आहे. अनेक शिकवणी वर्गांचे महाविद्यालयांशी संलग्नीकरण असते. त्यामुळे विद्यार्थी अशाच महाविद्यालयातील प्रवेशाला प्राधान्य देतात. मात्र, ऑनलाइन प्रवेशामुळे आपल्या शिकवणी वर्गाचे संलग्नीकरण असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाणे कठीण जाते. त्यामुळे शिकवणी वर्गानी आपला मोर्चा शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांकडे वळवला आहे. परिणामी, शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही धोक्याची घंटा ठरत असून येथील शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा… राज्यात हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ

मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने नव्याने मान्यता घेतलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या अडचणीत भर पडणार आहे. विद्यार्थी संख्या अपुरी असल्याने त्यांना आपली महाविद्यालय चालवणे कठीण होणार आहे.

Story img Loader