छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत काही दुचाकीस्वार युवक हातात तलवारी घेऊन फिरवत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. पोलिसांनी चित्रफितीच्या आधारे मिरवणुकीच्या आयोजकांसह ९ युवकांवर गुन्हे दाखल करून सहा युवकांना अटक केली. ही मिरवणूक विनापरवानगी काढण्यात आली होती.
हेही वाचा- नागपूर: औषधनिर्माणशास्त्राच्या अभ्यासक्रमात लवकरच बदल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारडीतील हिंदवी साम्राज्य ग्रुपचे अंकित पंचबुधे आणि आशीष आंबुले यांनी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. यामध्ये जवळपास ६०-७० दुचाकीस्वार युवकांनी सहभाग घेतला होता. यापैकी काही दुचाकीस्वार युवक गोळीबार चौक ते महाल दरम्यान हातात तलवारी घेऊन फिरवत होते. हा सर्व प्रकार एका युवकाने मोबाईलमध्ये चित्रित केला. ती चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली.
हेही वाचा- साक्ष फिरवाल तर खबरदार! बुलढाणा न्यायालयाचा अभूतपूर्व निकाल, वाचा..
२१ फेब्रुवारीला तहसीलचे निरीक्षक विनायक गोल्हे यांनी चित्रफितीबाबत शहानिशा करून गुन्हे दाखल केले. यामध्ये अंकित पंचबुधे, आशीष आंबुले, कुंदन तायवाडे, आदित्य सिंगुनजुडे, राकेश शाहू, सुमेध तांबे, रजत आंबोलीकर, योगेंद्र बागडे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल करून ६ आरोपींना अटक केली. अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.