सहा वर्षांत ११९.११ कोटींचा फटका; माहिती अधिकारातून तपशील उघडकीस
महेश बोकडे
नागपूर : भारतीय स्टेट बँकेच्या देशभरातील सगळय़ाच शाखेत १ जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ‘एटीएम’शी संबंधित ११९ कोटी ११ लाख रुपयांच्या फसवणुकींची १६ हजार ६४० प्रकरणे नोंदवली गेली. सर्वाधिक प्रकरणे २०२० या वर्षांतील असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले. स्टेट बँकेच्या देशभरातील शाखेत २०१७ मध्ये १० कोटी १९ लाख रुपयांच्या फसवणुकींची ४७० प्रकरणे घडली. २०१८ मध्ये १३ कोटी ५ लाख रुपयांच्या फसवणुकींची १ हजार ५३२ प्रकरणे, २०१९ मध्ये ३१ कोटी ९८ लाख रुपयांच्या फसवणुकींची ४ हजार ७६१ प्रकरणे, २०२० मध्ये २९ कोटी ९० लाख रुपयांच्या फसवणूकींची ५ हजार ९३१ प्रकरणे, २०२१ मध्ये १६ कोटी २४ लाख रुपयांच्या फसवणुकींची २ हजार ७७१ प्रकरणे, तर १ जानेवारी २०२२ ते सप्टेंबर- २०२२ पर्यंत १७ कोटी ७५ लाख रुपयांच्या फसवणुकींची १ हजार १७५ प्रकरणे घडल्याचेही माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले.
कायदेशीर कारवाई स्टेट बँकेच्या संबंधित विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही माहिती संबंधिताला दिल्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबईचे उपमहाव्यवस्थापक व केंद्रीय माहिती अधिकारी ईश्वर चंद्र शाहू यांनी स्पष्ट केले. तक्रारीनंतर बँकेचा संबंधित विभाग त्यावर कायदेशीर कारवाई करत असल्याचाही दावा त्यांनी केला.