सहाव्या वर्गात शिकत असलेल्या मुलाला पहिल्या शैक्षणिक सत्रात कमी गुण मिळाल्याने पती-पत्नी दोघेही तणावात होते. पतीने पत्नीला मुलाच्या प्रगतीपुस्तक बघून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रंजना नितीन इंदरे (३५, आनंदनगर, जयताळा) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना इंदरे हे खासगी काम करतात. त्यांचा मुलगा एका नामांकित शाळेत सहाव्या वर्गात शिकतो. अभ्यासात हुशार असलेल्या मुलाचा टीव्ही आणि मोबाईल बघण्याचा वेळ वाढला. त्यामुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. गेल्या दोन दिवसांपूर्वीच मुलाचा सहाव्या वर्गाचा पहिल्या शैक्षणिक सत्राचा निकाल लागला. मुलाला पालकांच्या अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. त्यामुळे पती-पत्नी दोघेही नाराज होते. मुलाला कमी गुण मिळण्याचे कारण काय? याचा विचार करायला लागले.
त्यानंतर पत्नीने मोबाईल मुलाच्या हातात दिला आणि त्याचे लक्ष अभ्यासावरून मोबाईलकडे जास्त गेले. त्यामुळे त्याला कमी गुण मिळाल्याचा निष्कर्ष पतीने काढला. त्यामुळे मुलाच्या भविष्याचा विचार करीत ती स्वत:ला दोषी ठरवायला लागली. त्यात पतीनेही तिच्यावरच राग काढल्याने रंजना नैराश्यात गेल्या.त्यामुळे शनिवारी सायंकाळी पाच वाजता धान्यात टाकायच्या कीटकनाशक गोळ्या खाऊन रंजनाने आत्महत्या केली. बाहेर गेलेले पती घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.