अकोला : कुशल युवकांना स्वयंरोजगार मिळावा व नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सेवांसाठी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्यप्राप्त उमेदवारांचा ‘डेटाबेस’ तयार करण्याचे काम जिल्हा कौशल्य विकास विभागाने हाती घेतले. शासकीय किंवा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतून किंवा अल्पकालीन प्रशिक्षण घेतलेल्या व स्वयंरोजगार करणाऱ्या प्रशिक्षित युवकांची नोंदणी केली जाणार आहे. राज्यातील हा अभिनव प्रयोग जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे.
जिल्ह्यातील कौशल्यप्राप्त उमेदवारांचा ‘डेटाबेस’ तयार करून तो ऑनलाइन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या दैनंदिन अत्यावश्यक सेवांसाठी विविध व्यवसाय करणाऱ्या कुशल उमेदवारांची ऑनलाईन माहिती मिळून इलेक्ट्रिशियन, प्लम्बर, ए.सी. टेक्निशियन, वाहनचालक, सुतार, गवंडी आदी आवश्यक मनुष्यबळ सहज उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे, कुशल उमेदवारांना याद्वारे रोजगारही प्राप्त होणार आहे. कुशल उमेदवारांचा डेटाबेस तयार करताना पोलीस पडताळणी व स्वयंघोषणापत्रही मिळविण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक सेवांसाठी विश्वासार्ह मनुष्यबळाचा तपशील अकोलेकरांना उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा – धक्कादायक..! समृद्धीवर प्रत्येक दोन दिवसांत एक बळी
हेही वाचा – न्यायालये बोलतात जनहिताचे, निर्णय मात्र वेगळाच! माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले…
स्वयंरोजगार करणाऱ्या युवकांनी या ‘डेटाबेस’मध्ये आपले नाव समाविष्ट होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा लागेल. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची पोलीस पडताळणी केली जाईल. इच्छुक उमेदवारांकडून स्वयंघोषणापत्र भरून घेण्यात येणार आहे. नोंदणीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.