नागपूर : स्वयंपाक करणे ही कला आहे. अनेक लोक विशेषत: गृहिणी हे कार्य वर्षानुवर्षे मोफत करत आहे. मात्र जर आता तुमच्याकडे स्वयंपाकाची कला आहे आणि तुम्ही यात पारंगत आहात तर तुम्हाला तब्बल ५२ हजार रुपये पगार असलेली नोकरी मिळू शकते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्वयंपाकी या पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी या पदाची मुदत राहील. किमान १८ ते कमाल ३८ वयोगटातील लोक यासाठी अर्ज करू शकतात. अनुसुचित जाती व जमाती घटकांसाठी वयात पाच वर्षांची सुट देण्यात आली आहे.
या आहेत अटी
या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता चौथी उत्तीर्ण आहे. उमेदवाराला स्वयंपाकशास्त्राचे पुरेसे ज्ञान असावे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच निर्व्यसनी असावा, अशी अटही ठेवण्यात आली आहे. उमेदवाराला हिंदी व मराठी भाषा लिहिता व वाचता यावी, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले. या पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ३ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजतापूर्वी विहित नमून्यात अर्ज स्पीड करायचा आहे. अर्जासोबत दोनशे रुपयांचा डिमांड ड्राफ्टही सादर करायचा आहे. हा अर्ज सिव्हिल लाईन्स येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या प्रशासकीय कार्यालयात स्पीड पोस्ट किंवा साधारण पोस्टच्या माध्यमातून पाठवायचा आहे.
अशी राहिल निवड प्रक्रिया
अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ५० गुणांची परीक्षा घेतली जाईल. यात ३० गुणांची स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा राहील. उमेदवाराला यात किमान १५ गुण मिळविणे आवश्यक आहे. याशिवाय १० गुणांची शारीरिक क्षमता चाचणी तसेच १० गुणांची तोंडी मुलाखत घेतली जाईल. अर्ज प्राप्त झाल्यावर परीक्षेंच्या तारखांबाबत अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून माहिती प्रकाशित केली जाणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले. उमेदवारांनी अर्जासोबत जन्मतारखेचा पुराव्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक, स्वयंपाकी कामाचा अनुभव असल्याचा दाखला, महाराष्ट्राचे अधिवासपत्र, जातीचा दाखला, दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांची उच्च शैक्षणिक पात्रता हाच केवळ निवडीचा निकष नसणार, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सादर करायची आहेत तसेच याबाबत अधिकृत संकेतस्थळावरील अर्जच स्वीकारणार येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.