अमरावती : भारत ही जगातील बलवान अर्थव्यवस्था झाली आहे. विविध क्षेत्रांत विकास व अनेक संधी निर्माण होत आहेत. हा विकास पुढे नेण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्मिती ही उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राची जबाबदारी असल्‍याचे प्रतिपादन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले. विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा, डॉ. अनिल बोंडे, रामदास तडस, आमदार सुलभा खोडके आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीस म्‍हणाले, विदर्भ ज्ञानविज्ञान संस्‍थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी वाटचाल होत आहे. येथे आवश्यक सर्व सुविधा उभारल्या जातील. शासनाने २५ कोटी दिले आहेत. एकल विद्यापीठासाठी लागणाऱ्या सर्व बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संस्थेलाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ निर्माण केले जाणार आहे. शैक्षणिक हब म्हणून जिल्ह्याचा विकास होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. ते लवचिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकता येईल. भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय, अभियंत्रिकी शिक्षण घेता येणार आहे.

हेही वाचा – व्याघ्र व्यवस्थापनात महाराष्ट्राची ‘डरकाळी’, वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ; वनमंत्री मुनगंटीवारांच्या नेतृत्वात वनखात्याची दर्जेदार कामगिरी

ही जागा माझ्यासाठी पवित्र

आपल्‍या जीवनात आपण जे काही मिळवतो, त्‍यामध्‍ये सर्वात मोठा वाटा हा आपल्‍या आई-वडिलांचा असतो. त्‍यामुळेच माझ्या आईने शिक्षण घेतलेली विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान संस्‍थेची जागा ही माझ्यासाठी अतिशय पवित्र असल्‍याचे उपमुख्‍यमंत्र्यांनी सांगितले. संस्थेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेचा इतिहास देदीप्यमान आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे अनेक महापुरुष याच महाविद्यालयात घडले. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी अनेक मोठी व्यक्तिमत्वे येथे घडली. आपल्या आईचे शिक्षण याच संस्थेत झाले. याचा अभिमान असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा – वर्धा : चुलीतून आगीचा भडका उडाला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले; युवकाचा होरपळून मृत्यू

किंग एडवर्ड कॉलेज १९२३ साली स्‍थापन झाले. स्‍वातंत्र्यानंतर त्‍याचे शासकीय विदर्भ महाविद्यालय असे नामकरण झाले. आज विदर्भ ज्ञान विज्ञान संस्‍था म्‍हणून या महाविद्यालयाची ओळख आहे. महाविद्यालयाच्‍या काळात उभारण्‍यात आलेल्‍या भिंती अनेक ऐतिहासिक घटनांच्‍या साक्षीदार आहेत. एखादा व्‍यक्‍ती १०० वर्षांचा होतो, तेव्‍हा त्‍याच्‍या जीवनाची इतिश्री होत असते. मात्र विदर्भ ज्ञान विज्ञान संस्‍थेसाठी हा एक टप्‍पा आहे, असे फडणवीस यावेळी म्‍हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skilled manpower generation is the responsibility of the education sector said deputy chief minister devendra fadnavis in amravati mma 73 ssb
Show comments