नागपूर : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दुसरीकडे सरकार नोकर भरती करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे. आगामी निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांना तो परवडणारा नसतो, अशा वेळी सरकार काही तरी नवीन करीत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा अशाच प्रकारचा प्रयत्न राज्यांच्या कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागाने केला आहे. तोही युद्धभूमी असलेल्या इस्रायलमध्ये. जेथे कोणी जाण्यास तयार नाही. प्रचंड अस्थिरता आहे, जीवावर बेतू शकेल अशा वातावरणात.

युद्धामुळे इस्रायलमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. तेथील युद्धात यापूर्वी काही भारतीयांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु, तेथील बांधकाम क्षेत्रातील कुशल कामगाराची गरज भागवण्यासाठी राज्याच्या कौशल्य विकास विभागाने कामगारांसाठी प्रशिक्षणासाठी अर्ज मागवले आहे.
इस्रायल हमास युद्धामुळे इस्रायलमध्ये बांधकामं रखडली आहेत. अनेक कंपन्यांनी कामगार कपात केली आहे. त्याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला असून तेथे या क्षेत्रातील कुशल कामगारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या क्षेत्रात तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण झाली आहे. अनेक देशांकडे इस्रायलकडून कुशल कामगारांची मागणी नोंदवली आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट इंटरनॅशनल आणि राज्य शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयाने इस्रायलमध्ये बांधकाम क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत बांधकाम क्षेत्रातील अनुभवी कामगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अशीही गुरुदक्षिणा!

जिल्हास्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. यासाठी दहावी पास किंवा नापास आणि २५ ते ४५ वर्षे वयोगटातील अनुभवी कामगार अर्ज करू शकतात. राज्यात सर्व जिल्हास्तरावर यासाठी नोंदणी सुरू आहे. नागपूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनीही त्याला दुजोरा दिला व हा केंद्राचाच कार्यक्रम असल्याचे सांगितले. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असा दावाही विभागाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – गोंदिया : वर्चस्वाच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील घटना

अस्थिरतेमुळे निर्णयाबद्दल आश्चर्य!

मार्च महिन्यात उत्तर इस्रायलमध्ये ‘अँटी-टँक रॉकेट’ हल्ल्यात एक भारतीय नागरिक ठार झाला तर दोन जण जखमी झाले होते. मृत भारतीय नागरिक हा मूळचा केरळ राज्यातील होता. याबाबत भारताने चिंताही व्यक्त केली होती. अशा स्थितीत भारतीय तरुणांना रोजगाराची गरज लक्षात घेऊन त्यांना तेथे पाठवण्यासाठी प्रशिक्षण देणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.