बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंत्रज गावात पाणीपुरवठा योजनेतून बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचा ‘स्लॅब’ पत्त्याच्या ढिगा सारखा अचानक कोसळला! निर्माणाधीन जलकुंभाला लागूनच अंगणवाडी आणि शासकीय रुग्णालय असला तरी सुदैवाने संभाव्य भीषण अनर्थ (प्राणहानी) टळला आहे.
अंत्रज गावात तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. मात्र, या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैर व्यवहार झाल्याचा आणि पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा अंत्रज येथील गावाकऱ्यातून होत आहे. पाण्याच्या टाकीचा ‘स्लॅब’ कोसळल्याने या आरोपाला एक प्रकारे पुष्टी मिळाल्याचे चित्र आहे. पाण्याची टाकी दुसऱ्यांदा उभारण्यात आली. आता पुन्हा नवीन टाकी उभारण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागावर येणार आहे.
जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ
ग्रामस्थांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात जलजीवन योजना राबवित आहे. मात्र संबंधित ठेकेदार,मनमानी यंत्रणेमुळे सरकारच्या उद्देशाला तडा जात आहे. पण खामगाव तालुक्यातही असाच प्रकार घडल्याने भ्रष्ट यंत्रणेमुळे जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ होत आहे.जलजीवन मिशन योजना अंतर्गत खामगाव तालुक्यातील अंत्रज या गावामध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असताना बांधकाम कोसळले. निकृष्ट दर्जाचे साहित्या वापरल्यानेच हा प्रकार झाला असावा. या घटनेने जिवितहानी झाली नसली तरी एकदोघांना दुखापत झाल्याचे समजते. या अगोदर सुद्धा २० फुटाचे बांधकाम केल्यानंतर ‘पिंजरा’ पाडण्यात आला होता. शासनाने ५ कोटी निधी उपलब्ध करून दिला असून निधीचाही गैरवापर चालू आह. एका पावसाच्या पाण्याने पाईपलाईन उघडी पडली आहे. याची उच्च स्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
संग्रामपुरात कोसळली होती टाकी
मागील वर्षी आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील चिंचारी निमखेडी येथील पाण्याची टाकी कोसळली होती. प्रकरण निस्तारण्याचे प्रकार सुरू झाले होते. मात्र याचे बिंग फुटल्याने कंत्राटदाराने पुन्हा पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याचा करारनामा जि.प. पाणी पुरवठा विभागाला करून दिला होता.