नागपूर : वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेची महत्वाची आणि प्रमुख रेल्वेगाडी असून सर्वत्र या गाडीची मागणी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मध्य रेल्वेच्या विभागाने नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त गाडी आहे. देशभरात सर्वत्र या गाडीची मागणी आहे. ही गाडी पाच ते सात तासांच्या प्रवासाकरिता आहे. त्यापेक्षा अधिक लांबच्या प्रवासाकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस येत आहे. या गाडीच्या डब्यांची निर्मिती होत आहे. देशभरातील रेल्वेच्या सर्वच विभागाने ही त्यांच्या विभागात सुरू करण्याची मागणी केली आहे. आम्हीसुद्धा महाराष्ट्रातील तीन महत्वाच्या शहरादरम्यान अशी गाडी चालवण्यासाठी आग्रही आहोत. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई दरम्यान स्लीपर वंदे भारत सुरू करण्याता यावी, असा प्रस्ताव नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. परंतु नवीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय सर्वस्वी रेल्वेबोर्डाचा असतो, अशी माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी दिली.
हेही वाचा – तरुणांनो प्रेम करा, पण…
नागपूर- सिकंदराबाद, नागपूर ते इंदूर आणि नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहेत. इंदूर आणि बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद आहे. सिकंदराबाद एक्सप्रेसला हवा त्या प्रमाणात प्रतिसाद नाही. ही गाडी सव्वासात तास वेळ घेते. दक्षिण भारताला जोडणारी ही महत्वाची गाडी असून २० डब्यांची आहे. देशातील काही निवडक शहरादरम्यान २० डब्यांची गाडी आहे. बहुतांश ठिकाणी आठ डब्यांची गाडी आहे. सिंकदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसचेदेखील आठ डबे करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक( प्रशासन) पी.एस. खैरकर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक( तांत्रिक) रुपेश चांदेकर, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक कृष्णाथ पाटील उपस्थित होते.
भुसावळ-नागपूर पॅसेंजरचा प्रस्ताव
करोना काळात भुसावळ-नागपूर-भुसावळ पॅसेंजर गाडी बंद करण्यात आली. ही लोकप्रिय गाडी असून ती पुन्हा सुरू करण्याची मागणी आहे. ही गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव देखील रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे, असेही गर्ग म्हणाले.
हेही वाचा – ‘लाडक्या बहिणी’ तुपाशी, ओबीसी विद्यार्थी उपाशी, चार महिन्यांपासून…
नागपूर-सेवाग्राम तिसरा मार्ग डिसेंबरपर्यंत
नागपूर ते इटारसी, नागपूर ते सेवाग्राम आणि सेवाग्राम ते बल्लारपूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिकेचे काम सुरू आहे. नागपूर ते सेवाग्राम आणि सेवाग्राम ते माजरी (बल्लारपूर) तिसरी मार्गिकेच काम डिसेंबर २०२५ पूर्ण करण्यात येणार आहे. नागपूर ते इटारसी तिसरी मार्गिका २०२६ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर चौथ्या मार्गिकेचे काम सुरू होईल, असेही ते म्हणाले.