लोकसत्ता टीम
यवतमाळ : जिल्ह्यात दिवाळापूर्वी बंद झालेली शेतमालाची खरेदी गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली. बाजारपेठत पहिल्याच दिवशी कापसाच्या शुभारंभाला सात हजार २०० रुपये क्विंटलचा दर मिळाला, तर सोयाबीनला पाच हजार ३०० रुपये क्विंटलचे दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दिवाळीपूर्वी शेतमालाच्या दरात मोठी घसरण झाली होती. एकूण उत्पादन घटलेले असताना शेतमालाच्या किमती घसरल्याने शेतकरी चिंतेत होते. आता शेतमालाच्या दरात किंचित वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीनंतर बाजारात शेतमालाच्या किमती सुधारतील अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार शेतमालाच्या किमतीत सुधारणा झाली. यात कापसाच्या दरामध्ये यवतमाळात शुभारंभाला २०० रुपयांची दरवाढ झाली.
आणखी वाचा-बुलढाणा : तिघांचे बळी घेणारा फरार ट्रॅव्हल्स चालक गजाआड; तीन दिवसानंतर अडकला जाळ्यात
यवतमाळच्या औद्योगिक वसाहतीमध्ये जैन कोटेक्समध्ये सात हजार २०० रुपये क्विंटलचे दर मिळाले, तर सोयाबीनला पाच हजार ३०० रुपये क्विंटलचे दर बाजारात मिळाले. एकूणच बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात राहिली. सोयाबीनच्या दरामध्ये ३०० रुपयांची वाढ झाल्याचे चित्र गुरुवारी यवतमाळच्या बाजारपेठेत होते. दिवाळीपूर्वी सोयाबीनला चार हजार ९०० ते पाच हजार रुपये क्विंटलचे दर होते. हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे ९०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. सोयाबीन ढेपेचे दर वाढल्याने या दरात सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे.