अमरावती : शेतीचा हंगाम आटोपण्याच्या स्थितीत असताना बाजारात कापूस, तूर आणि हरभरा दरात किंचित सुधारणा झाली असली, तरी त्याचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कितपत होईल, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
पश्चिम विदर्भातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ७ हजार ४५० ते ७ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. केंद्र सरकारने कापसाला ७०२० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. सध्या कापसाचे दर वधारले आहेत. कापसाला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे समाधान शेतकऱ्यांमध्ये आहे. पण, सध्या शेतकऱ्यांकडील कापूस संपण्याच्या स्थितीत आहे. यापूर्वी कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी होते. त्या कारणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापूस विकल्याने बाजारात आवक अवघी ८० क्विंटलपर्यंत होत आहे.
पश्चिम विदर्भातील बाजारात तुरीसोबतच हरभरा दरात सातत्याने सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी गर्दी वाढली आहे. अमरावती बाजार समितीत दर दिवशी तुरीची साडेसहा हजार क्विंटल तर हरभऱ्याची विक्रमी १२ हजार क्विंटलपेक्षा अधिकची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.
यंदा या दोन्ही शेतीमालांचे दर हंगामाच्या सुरुवातीला दबावात होते. केंद्र सरकारकडून देखील ग्राहकहिताला प्राधान्य देत आयात-निर्यात धोरणात सातत्याने बदल केले जात आहेत. त्यामुळे कधीही दर दबावात येण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच आता बाजारात तूर आणि हरभरा दरात काही अंशी सुधारणा होताच शेतकऱ्यांनी तूर आणि हरभरा विक्रीसाठी धावपळ सुरू केली आहे.
हेही वाचा…नागपूर : धक्कादायक! सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
गुरूवारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत ११ हजार १५७ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. किमान ५ हजार १०० तर कमाल ६ हजार १०० म्हणजे सरासरी ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. अकोला बाजार समिती ३ हजार २०२ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आणि सरासरी ५ हजार ६५० रुपये दर मिळाले. कारंजाच्या बाजारात ४ हजार ५०० क्विंटल आवक होऊन सरासरी ५ हजार ४५० रुपये भाव मिळाला.
हेही वाचा…वर्धा : अखेर माजी आमदार अमर काळे लोकसभा लढण्यास तयार, पण…
बाजारात सध्या तुरीला सरासरी ९ हजार ९५६ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. कमाल दर १० हजार ४१२ पर्यंत आहे. तुरीचे दरही काहीसे दबावात असल्याने बाजार आवक मंदावत दोन ते तीन हजार क्विंटलपर्यंत मर्यादित झाली होती. आता तुरीची विक्री वाढली आहे. अमरावतीच्या बाजारात गुरूवारी ६ हजार ७८९ क्विंटल तुरीची आवक झाली.