अकोला : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत अकोला रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री समोरा-समोर उभे ठाकले होते. यावेळी शिवसैनिकांनी ‘५० खोके, एकदम ओके’, ‘ गद्दार-गद्दार,’ अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही अकोला रेल्वेस्थानकावरील वातावरण तापले होते.
शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि उद्ध ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे जाण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री दाखल झाले. दोन्ही खासदार अचानक समोरासमोर आले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘गद्दार-गद्दार’ अशी जोरदार नारेबाजी झाली. यामुळे अकोला रेल्वे स्थानकावर चांगलाच गोंधळ उडाला. खा. भावना गवळी रेल्वेगाडीत बसल्यानंतरही त्यांच्यासमोर ‘५० खोके एकदम ओके,’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शिवसेना महानगराध्यक्ष राजेश मिश्रा, युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कराळेसह, आदी शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खा. विनायक राऊत यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका केली. महाराष्ट्र संस्कृती जपणारे राज्य असून साधूसंतांची भूमी आहे. या भूमीने विचार दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या घाणेरडे राजकारण सुरू असून पैशाने राजकारणही विकत घेतले जात आहे. हा धंदा सर्वप्रथम भाजपने सुरू केला, त्यानंतर महाराष्ट्रातील वैचारिक पातळी घसरलेली आहे, असा आरोप खा. राऊत यांनी केला.