नागपूर: बुधवारी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना अभ्यागतांच्या गॅलरीतून दोन अभ्यागतांनी उड्या घेतल्यानंतर तेथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या पत्रकार कक्षातून घोषणा देण्याची घटना घडली.
हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित
विधानसभेत गुरूवारी मराठा आरक्षणावर चर्चा झाली. सभागृहाचे कामकाज उशिरापर्यंत सुरू होते सायंकाळी कामकाज सुरु असताना पत्रकार गॅलरीत येऊन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी तालिका अध्यक्षांकडे पाहात हातवारे करीत विदर्भाबद्दल का बोलत नाही अंशी विचारणा केली. यावर भाजपचे आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. ही कसली सुरक्षा ? संसदेत घडलेल्या घटनेनंतर विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत कोणीतरी येतो, अध्यक्षांकडे हातवारे करून घोषणाबाजी करतो? कोण आहे ही व्यक्ती? त्यांना प्रवेश कसा मिळाला? विधानसभेची सुरक्षा कशी काय भेदली? असे प्रश्न उपस्थित करुन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी मागणी मान्य करीत चौकशीचे आदेश दिले. पोहरे एवढ्यावरच थांबले नाहीतर खाली उतरीत मीडिया पोडियमसमोर येऊन स्वत:च बाईट दिला. अधिवेशनात विदर्भाच्या मुद्द्यांवर बोलत नसल्याचे सांगितले. विधिमंडळ सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात झटापट झाली. शेवटी सुरक्षारक्षकांनी पोहरे यांना तिथून हटवून ताब्यात घेतले.