अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याविरोधात आंबेडकरी अनुयायांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी सायंकाळी इर्विन चौक परिसरात ही घटना घडली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
हेही वाचा – “…कांजूरमार्गची उरलेली जागा कुणाच्या घशात घालणार?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल!
राणा दाम्पत्यासमोर अनुयायांची घोषणाबाजी
शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रम आणि शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पक्षांतील राजकीय नेत्यांनी हजेरी लावत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. अमरावतीतही खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इर्विन चौकात दाखल झाले होते. मात्र, यावेळी अनुयायांनी “कोण आले रे कोण आले, भाजपाचे दलाल आले” अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीवेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
खासदार राहुल शेवाळेंचाही व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचाही एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. खासदार राहुल शेवाळे हे गुरुवारी चेंबूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन गेले होते. मात्र, यावेळी काही अनुयायांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखल्याचं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं होतं. अखेर राहुल शेवाळे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं.