विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मतदानाची गती संथ असल्याचे चित्र आहे. सकाळी १० वाजेपर्यंत ५.४९ टक्के मतदानाची नोंद झाली.
हेही वाचा >>>विधानपरिषद निवडणूक: भाजपा उमेदवार रणजीत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप!
विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये २६२ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. अमरावती विभागात १ लाख ३४ हजार १४ पुरूष आणि ७२ हजार १४१ महिला व इतर १७ असे एकूण २ लाख ६ हजार १७२ मतदारांची नोंदणी झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात ४.२५ टक्के, अकोला जिल्ह्यात ५.५३ टक्के, बुलढाणा जिल्ह्यात ६.३८ टक्के, वाशिम जिल्ह्यात ७.४२ टक्के तर यवतमाळ जिल्ह्यात ५.७८ टक्के मतदान झाले आहे.
हेही वाचा >>>राष्ट्रीय महामार्गावरील काळविटांच्या मृत्यूचे नेमके कारण काय?
या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. भाजपाने मावळते आमदार डॉ. रणजित पाटील यांना उमेदवारी दिली असून, ‘मविआ’तर्फे काँग्रेसचे धीरज लिंगाडे मैदानात आहेत. त्यांच्यासह एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अनिल अंमलकार, आम आदमी पार्टी पुरस्कृत डॉ. भारती दाभाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे किरण चौधरी आदी उमेदवारही रिंगणात आहेत.