विधान परिषद निवडणूक मोर्चेबांधणी
विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषद आणि महापालिकेतील अपक्षाचा गट तसेच छोटे पक्ष यांना आपल्याकडे वळवण्यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू करताच अचानक छोटे पक्ष आणि अपक्षांचे महत्त्व वाढले आहे.
या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मतदार असतात. त्याची संख्या मर्यादित असल्याने मतदारांशी थेट संपर्क उमेदवारांचा असतो. छोटे गट, अपक्ष यांच्या मतांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते. पक्षाच्या चिन्हांवर निवडून येणाऱ्यांपेक्षा अपक्षाचा भाव वधारलेला असतो. ही बाब ओळखूनच इच्छुकांनी त्यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महापालिका, जिल्हा परिषदमध्ये भाजपचे बहुमत असले तरी इच्छुक उमेदवारांची खरी मदार अपक्ष सदस्यांवर राहणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतच्या सदस्यांसह अपक्ष सदस्य मतदान करणार आहेत. महापालिकेत १४५, जिल्हा परिषदेत ५९, नगर परिषदेत २६३ सदस्य आहेत. याची संख्या ४६७ आहे. त्यात भाजपचे २०५ तर अन्य २६२ सदस्य आहेत. नगर पंचायत ५१ सदस्यांमधून भाजपचे १४ सदस्य निवडून आले आहेत. अन्यमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष सदस्यांचा समावेश आहे.
महापालिकेत भाजपचे सदस्य सोडून नागपूर विकास आघाडीमध्ये अपक्ष आणि छोटे पक्ष असलेल्या सदस्यांची संख्या ही १८ आहे, तर जिल्हा परिषदेमध्ये ४ सदस्य आहेत. याशिवाय नगर पंचायतमधील अपक्ष सदस्यांची संख्या आहे. महापालिकेत अपक्षाचे नेते म्हणून उपमहापौर मुन्ना पोकुलवार आहेत. इतर काही पक्ष आहेत ज्यांची सदस्य संख्या ही एकआकडी आहे. अटीतटीच्या निवडणुकीत ही मते निर्णायक ठरतात. याची जाणीव अपक्ष आणि छोटय़ा पक्षांना असल्याने ते त्यांच्या मतांचे व्यावहारिक मोल ठरवितात. पुढच्या काळात या मतांसाठी लढतीत असलेल्या दोन प्रमुख उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू होईल. ‘जिधर धन उधर हम’ अशी सर्वसाधारणपणे अपक्षांची भूमिका असते. मात्र गेल्या काही निवडणुकांचा अनुभव लक्षात घेतला तर दोन्ही बाजूंनी ‘धन’ असल्याने नेमके कोणाकडे जायचे, असा पेच निर्माण होतो. याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच पाहायला मिळते.
महापालिकेत आघाडीमध्ये असलेल्या काही ज्येष्ठ अपक्ष सदस्यांनी या दृष्टीने काही छोटय़ा पक्षाशी बोलणे सुरू केले आहे. याशिवाय जिल्हा परिषद आणि नगर पंचायतमधील काही अपक्ष सदस्यांना विश्वासात घेऊन स्वतंत्र गट तयार करण्याच्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे. अधिवेशनाच्या तोंडावर ती लागल्याने अधिवेशनाच्या उत्साहावरच पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने अद्याप त्याची व्यूहरचना उघड केली नाही. उमेदवारांबाबत दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरू असून रोज नवनवी नावे पुढे येत आहेत. उमेदवार निश्चित झाल्यावरच या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Story img Loader