स्मार्ट आरटीओ कार्यालय स्थापणार
वाहनचालक परवाना देताना ‘सिम्युलेटर’वर चाचणी घेणारे राज्यातील पहिले केंद्र पूर्व नागपुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू करण्यात येण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. गुंडाराज संपवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचनाही त्यांनी पोलिसांना केली. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पूर्व नागपुरातील प्रादेशिक कार्यालयात ‘सिम्युलेटर’ यंत्रणावर वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या वाहन चालकाची परीक्षा घेण्याची सोय करण्यात येणार आहे. राज्यात ही सेवा प्रथमच पूर्व नागपुरातील आरटीओ कार्यालयात सुरू होत आहे.
पूर्व नागपुरात स्मार्ट आरटीओ कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. या आधुनिक यंत्राच्या माध्यमातून उत्तम चालक तयार होतील. ‘सिम्युलेटर’वर चाचणी घेता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम मार्चपर्यंत सुरू होणार आहे. चिखली येथील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम प्रस्तावित आहे.
या इमारतीमध्ये परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विश्रांतीगृह राहणार आहे. तसेच अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. पाच वर्षांआधी नागपूर शहरातील परिवहन कार्यालयाचे विभाजन करण्यात आले होते. पूर्व नागपुरातील रिंग रोडवरील कळमना रेल्वे उड्डाण पुलालगत १८,०७९ चौ.मीटर जागेवर ही नवीन इमारत राहणार आहे.
नागपूर सुधार प्रन्यास हे बांधकाम करणार आहे. या इमारतीमध्ये तळमजल्यावर प्रतीक्षालय, परमिट सेकशन, ट्रान्सपोर्ट सेक्शन, नॉन ट्रान्सर्पाट सेक्शन आणि पहिल्या तसेच दुसऱ्या मजल्यावर रेकॉर्ड सेक्शन, भव्य कॉन्फरन्स हॉल, निरीक्षकांसाठी विशेष खोल्या, सिक्युरिटी रुम, सार्वजनिक शौचालय इत्यादी राहणार आहे. कार्यालय परिसरातील वाहनतळावर भरपूर जागा राहणार आहे.

Story img Loader