नागपूर : लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये धूर सोडणाऱ्या बिस्किटांचे आकर्षण वाढले आहे.हे बिस्कीट नायट्रोजनमध्ये बुडवले जात असल्याने त्यातून धूर निघतो. हा धूर मानवाच्या फुफ्फुसापर्यंत जाऊन इजा करतो. त्यामुळे श्वसन विकार संभवतात, असे निरीक्षण क्रीम्स रुग्णालयाच्या अभ्यासात नोंदवण्यात आले आहे. हे संशोधन रेस्पिरेटरी केस रिपोर्ट या हेल्थ जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

हल्ली नागपूरसह राज्यातील विविध भागात लग्न समारंभ, वाढदिवस, विविध मेळाव्यांसह इतरही कायर्क्रमात तोंडातून धूर सोडणार्‍या बिस्किटांचे फॅड आले आहे. लहान मुलांपासून सगळ्याच वयोगटातील नागरिकांना त्याचे आकर्षण आहे. मात्र, ही बिस्किटी दुसरं तिसरं काही नसून लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलेली बिस्किटे आहेत. तोंडात कोंबल्यावर ही बिस्किटे धूर सोडतात, ती नायट्रोजनची वाफ असते. ही नायट्रोजनची अतिथंड वाफ तोंडाद्वारे फुफ्फुसांपर्यंत जाते आणि इजा करते; मुख्य म्हणजे त्यामुळे अस्थमासारखे श्वसन विकार होतो.

हेही वाचा >>>नागपूर:‘लोकसभा’ जिंकण्यासाठी गडकरींनी केला होता ‘हा’ नवस…

क्रीम्स रुग्णालय हे बिस्किट सेवन केलेल्या मुलावर अभ्यास केला गेला. येथे काही महिन्यापूर्वी एक १० वर्षीय बालक महिनाभरापासून कोरडा खोकल्याची समस्या घेऊन आला होता.बुजलेले नाक, गळ्यात खवखव आणि डोकेदुखीही होती. सुरवातीला मुलाने इतर खासगी डॉक्टरकडे उपचार घेतला. येथे मुलावर प्रतिजैविकाची मात्राही पूर्ण केली गेली. परंतु आराम पडला नाही. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्याने रुग्णाला नागपुरातील क्रीम्स रुग्णालयात श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांना दाखवले गेले. येथे इतिहासात मुलाने काही दिवसांआधी धूर सोडणारे नायट्रोजन बिस्कीट खाल्ल्याचे पुढे आले. लिक्विड नायट्रोजनचे तापमान शुन्याहून कमी असते. हे बिस्कीट खाल्ल्याने श्वासनलिकेतील तापमान अचानक कमी होते. त्यामुळे रुग्णाला गळ्यात अस्वस्थ आणि श्वसननलिका बधिर वाटू लागते. हा गंभीर प्रकार असल्याने क्रीम्स रुग्णालयातर्फे डॉ. अशोक अरबट यांनी त्यावर संशोधनात्मक काम केले. शेवटी हा शोध प्रबंध नावाजलेल्या रेस्पिरेटरी केस रिपोर्ट या हेल्थ जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. हे संशोधन ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्या मार्गदर्शनात श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. गौरी घाडगे, डॉ. परिमल देशपांडे, डॉ. स्वप्निल बाकमवार व डॉ. श्वेता चौरसिया यांनी केले.

हेही वाचा >>>ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…

बंदी घालणे आवश्यक

“लिक्विड नायट्रोजन वापरून बनवलेल्या बिस्किटांचे सेवन केल्याने अस्थमा, श्वसन विकार वाढतात, हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी या बिस्किटांचे सेवन टाळावे. तामिळनाडूसारख्या राज्यात यावर बंदी आहे. महाराष्ट्रातही यावर बंदी हवी.”  – डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ, क्रीम्स रुग्णालय.