१५ वस्त्यांमधील २५ हजार नागरिकांना फटका
भाग-१
२५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या संपूर्ण नागपूर शहराचा कचरा भांडेवाडीत गोळा केला जातो. एका अर्थाने संपूर्ण शहराची घाण या भागात टाकण्यात येते. हा परिसरात प्रभाग क्रमांक २६ आणि बिडगाव यातील सुमारे २५ ते ३० हजार लोकसंख्या आहे. कचऱ्याची दरुगधी ही या भागातील लोकांच्या पाचवीला पुजली असून आगीच्या घटनांनी परिसरातील नागरिक बेजार झाले आहेत. सोळा-सतरा वर्षांपासून येथे राहणारे आणि मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्यांना आगीच्या धुरामुळे मरणयातना सहन कराव्या लागत आहे. त्यांच्या आरोग्यविषयी समस्या निर्माण झाल्या आहेत. देवनारच्या कचराघराचे प्रश्न विधानसभेत मांडणारे भांडेवाडीमुळे त्रस्त हजारो लोकांच्या जगण्याच्या प्रश्नाकडे कायम पाठ फिरवित आहेत. गेल्या महिनाभरात भांडेवाडीत आगीच्या दोन घटना घडल्या आणि पुन्हा एकदा सुमारे दोन किमी परिसरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांचे यातना चव्हाटय़ावर आल्या. त्याअनुषंगाने भांडेवाडी कचराघर, परिसरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांच्या समस्या आणि शासन, प्रशासनाची उदासीनता यावर प्रकाश टाकणारी ‘लोकसत्ता’ची ही वृत्तमालिका.
भांडेवाडी कचराघरातील आगीच्या घटना आणि त्यातून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील वस्त्यांमधील नागरिक त्रस्त असून अनेक वयोवृद्ध नागरिकांनी इतर ठिकाणी राहणाऱ्या नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे. दाटीवाटीने असलेल्या वस्त्या आणि आग, प्रदूषणावर नियंत्रणासाठी कुठलीच यंत्रणा नसल्याने परिसरातील सुमारे १५ वस्त्यांमधील नागरिक मरणयातना सहन करीत आहेत.
शहराच्या पूर्व दिशेला भांडेवाडी नावाचे गाव होते. ते आता महापालिका हद्दीत आले आहे. या गावातील मोकळ्या जागेवर कत्तल खाना आणि कालांतराने कचरा टाकण्यात येऊ लागला. त्यापूर्वी शहराच्या चारही दिशांना कचरा गोळा करण्याची व्यवस्था होती. त्या भागात विरोध झाल्याने आणि मोठा भूखंड महापालिकेच्या ताब्यात असल्याने भांडेवाडी येथे कचरा टाकणे सुरू झाले. शहर वाढत गेले तसेच कचरा वाढत गेला. या भागात जैव कचरा देखील नष्ट करण्यात येतो. शहराच्या सीमेला लागून असलेले हे कचराघर नागरी वस्त्यांनी वेढलेले आहे. कचराघराच्या पूर्वेला बिडगाव आणि उर्वरित दिशेला महापालिका हद्दीत १५ वस्त्या आहेत.
संपूर्ण शहरातील हजारो टन कचरा येथे टाकण्यात येत असल्याने कचऱ्याचे डोंगर तयार झाले. हवेमुळे परिसरातील वस्त्यांमध्ये कचरा उडतो. कचरा टाकण्यासाठी शास्त्रीय पद्धत वापरण्यात येत नसल्याने पावसाळ्यात चिखल तयार होतो.
कचऱ्यात मिथेन गॅस तयार होत आगीच्या घटना सातत्याने घडतात. त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे सुमारे २ किमी अंतरावरील वस्त्यांमधील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कंपोस्ट डेपोच्या जागेवर अवैधपणे कचरा टाकण्यात आला असून येथे त्यासाठी आवश्यक कुठलेही मार्गदर्शक तत्त्वे पाळण्यात येत नाही.
१० एप्रिलला या भागात मोठी आग लागली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर धुराने व्यापून गेला होता. अनेकांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. पवनशक्ती नगरातील गुलामभाई (५०) यांना दम्याचा त्रास आहे. या धुरामुळे अस्वस्थ वाटायला लागल्याने ते खरबी येथे राहणाऱ्या भावाकडे राहायला गेले. या भागात राहणारे शेख फैयाज यांच्या दोन वर्षांची मुलगी अलयाना हिला धुरामुळे ओकाऱ्या झाल्या, ताप चढला. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कचराघर बिडगावला जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून आहे. कचरा नेताना तो उडून रस्त्यावर, वस्त्यांमध्ये येतो. कचराघराच्या भिंती तुटलेल्या आहेत. त्यामुळे शेजारच्या वस्त्या तसेच वाटसरूनांही कचऱ्याच्या दरुगधीचा त्रास होतो. कचऱ्याधील पदार्थ खाण्यासाठी कुत्रे झुंडीने येतात. जवळच ‘डॉग शेल्टर’ आहे. शेजारच्या वस्तीला मुलांना कुत्रे चावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आगीच्या घटना रोखण्यासाठी तसेच आग तातडीने विझवण्यासाठी कुठलीच यंत्रणा नाही.
डम्पिंग यॉर्डसाठी फक्त एक गाडी
१० एप्रिला मोठी लागली होती. त्यामुळे आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये विषारी धुरामुळे नागरिकांचे हाल झाले. त्यावेळी आगीचे नऊ बम्ब लावून आग विझवण्यात आली. भांडेवाडी डम्पिंग यॉर्डसाठी आगीचा एक बम्ब राखीव आहे. लकडगंज अग्निशमन केंद्रात ही गाडी ठेवण्यात येते. या गाडीवर चालकासह तीन कर्मचारी आहेत.