नागपूर: फुफ्फुसांच्या एकूण कर्करुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन होते. त्यामुळे या आजाराला धूम्रपानही एक प्रमुख कारण असल्याचे निरीक्षण नागपुरातील क्रिम्स रुग्णालयाच्या आंतर्गत अभ्यासात पुढे आले आहे. १ जून रोजी जागतिक फुफ्फुस कर्करोग दिवस असून त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.
नागपूरसह मध्य भारतात विविध कर्करुग्णांच्या एकूण रुग्णांमध्ये १० टक्के रुग्ण हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आहेत. फुफ्फुसाच्या कर्करुग्णांची इतिहास बघितल्यास त्यापैकी ९० टक्के रुग्णांना धूम्रपान करण्याची सवय होती. याशिवाय क्रीम्स रुग्णालयात दरवर्षी आढळणाऱ्या नवीन कर्करोगांपैकी ७ टक्के कर्करुग्ण हे फुफ्फुसाचे होते, अशी माहिती क्रिम्स रुग्णालयाचे संचालक व सुप्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली. फुफ्फुसाच्या कर्करोगाला सर्वात मोठे कारण हे धूम्रपान असून ८० ते ९० टक्के रुग्णांना धूम्रपान करणारे होते. सोबत २८.६ टक्के रुग्णांकडून तंबाखू व तत्सम व्यसन केले जात होते. त्यामध्येही पुरुषांचे प्रमाण ४२.४ टक्के आहे तर महिलांचे प्रमाण १४ टक्के आहे. फुफ्फुसाच्या अन्य कारणांमध्ये अनुवांशिक कारणे, वाढते प्रदूषण वा प्रदूषित हवेचा सततचा सहवास (मग तो कंपन्यांमध्ये असो वा वातावरणातील) आणि दीर्घकालीन काही कारणे असल्याचेही डॉ. अरबट म्हणाले. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या पूर्वलक्षणांमध्ये दीर्घकाळ खोकला व कफ असणे, खोकल्याद्वारे आणि कधी थुकीद्वारे रक्त जाणे, श्वास घेताना त्रास होणे, चेहरा व आवाजात बदल होणे, रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने सतत फुफ्फुसाचे इंफेक्शन व न्युमोनिया होणे या लक्षणांचा समावेश आहे. सोबतच दीर्घकाळ ताप असणे, अशक्तपणा, वजन कमी होणे ही लक्षणेही आढळून येतात. त्यामुळे या असल्या कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. अशी लक्षणे दिसून आल्यावर तातडीने श्वसनरोग तज्ज्ञ तथा कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळीच आजाराचे निदान व उपचार झाल्यास भविष्यातील जोखीम टाळता येत असल्याचेही डॉ. अरबट म्हणाले.
डॉक्टर काय म्हणतात ?
फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्याचा उपाय म्हणजे धूम्रपान सोडणे हाच आहे. धूम्रपानाने आम्हाला काही होणार नसल्याचा आव चुकीचा आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगापासून दूर राहण्यासाठी धूम्रपान सोडणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केले. डॉ. परिमल देशपांडे म्हणाले, आधुनिक निदान प्रक्रिया ‘क्रायो बायस्पी’ ही अन्य निदान प्रक्रियांसोबतच एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे कर्करोगाचे निदान होऊन पुढील उपचारांची दिशा ठरवता येते. डॉ. स्वप्निल बाकमवार म्हणाले, अनेकदा रुग्ण स्वतः धूम्रपान करीत नसला तरी धूम्रपान करणाऱ्याच्या आसपास असतो. त्यामुळे या धुरामुळे देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.